X
X

Video: पुण्यात शिवभोजनासाठी पोलीस बंदोबस्त; १० रूपयांच्या थाळीसाठी भलीमोठी रांग

READ IN APP

हाणामारीच्या प्रकारानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यातील मार्केट यार्ड मधील हॉटेल समाधान मध्ये शिवभोजन सुरू करण्यात आले आहे. राज्य सरकारची ही शिवभोजनासाठी थाळ्यांची मर्यादा असली तरी त्याला अनेक ठिकाणांहून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी शिवभोजन थाळीसाठी अनेक लोक आल्यानं गोंधळ आणि हाणामारी झाल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या बंदोबस्तात शिवभोजन थाळीचं वितरण करण्यात आलं.

“काही दिवसांपूर्वी काही लोकांनी आम्हाला थाळी द्या असा आग्रह धरला होता. खरे लाभार्थी कोण हे नक्की कळलं पाहिजे आणि त्यांना या थाळीचा लाभ मिळाला पाहिजे. शिवभोजन थाळीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सरकारनं या थाळ्यांची संख्या आणि वेळ वाढवून दिली पाहिजे,” असं मत शिवभोजन थाळी विक्रेते अंकुश मोरे यांनी व्यक्त केलं आहे.

“या ठिकाणी या थाळीसाठी कुपनची संख्या मर्यादीत आहे. कुपन मिळाल्यानंतर पहिले कोण जायचं यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे आज आम्हाला बोलावण्यात आलं. आम्ही या ठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांची नीट रांग लावून त्यांना आतमध्ये सोडत आहोत,” अशी प्रतिक्रिया बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकडून देण्यात आली.

गोरगरिबांना १० रुपयांत सकस जेवण देण्यासाठी शिवसेनेच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या शिवभोजन योजनेत पहिल्या दोन दिवसांत २५ हजार जणांनी थाळीचा लाभ घेत चांगला प्रतिसाद दिल्याने आता नवीन आर्थिक वर्षांपासून म्हणजेच एप्रिलपासून योजनेची व्याप्ती वाढवत रोज एक लाख जणांना शिवभोजनाचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यासाठी वर्षांला १२५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने तयारी सुरू केली आहे.

प्रजासत्ताकदिनी ३६ जिल्ह्य़ांतील ५० केंद्रांत प्रायोगिक तत्त्वावर शिवभोजन योजनेचा आरंभ झाला. पहिल्या दोन दिवसांत या केंद्रांतून २५ हजार लाभार्थ्यांनी थाळीचा आस्वाद घेतला. पहिल्या दिवशी ११ हजार ४०० थाळी, तर दुसऱ्या दिवशी १३ हजार ५०० हून अधिक थाळींचा आस्वाद राज्यातील लोकांनी घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापूर आणि नंदुरबार येथील शिवभोजन केंद्रात जेवणासाठी आलेल्या सर्वसामान्य लोकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून थेट संवाद साधला. या वेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्या कल्पनेतील शिवभोजन योजनेचा स्वीकार सहभागी काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही सहकारी पक्षांनी केला व त्यास पाठिंबा दिल्याचे समाधान असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

या योजनेला लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्या मार्चपर्यंतच्या तीन महिन्यांसाठी राज्यातील ५० केंद्रांवरून शिवभोजन देण्यासाठी साडेसहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आता ही योजना ५०० केंद्रांपर्यंत वाढवून दररोज एक लाख थाळी देण्याचा विचार सुरू झाला आहे. त्यासाठी वार्षिक १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची तयारी असल्याचे उच्चपदस्थांनी सांगितले.

22

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on: January 29, 2020 1:18 pm
Just Now!
X