वीजबिलाचा भरणा करण्यासाठी जुन्या पाचशे व एक हजार रुपयाच्या नोटा स्वीकारण्याची मुदत राज्य शासनाने आणखी वाढविली असल्याने त्यानुसार येत्या २४ नोव्हेंबपर्यंत घरगुती व वैयक्तिक ग्राहकांच्या वीजबिलासाठी जुन्या नोटा महावितरणकडे स्वीकारल्या जाणार आहेत. वीजबिलापोटी केवळ चारच दिवसांत महावितरण कंपनीकडे तब्बल ४६ कोटी रुपयांच्या जुन्या नोट जमा झाल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार वीजबिल भरण्यासाठी महावितरणकडून महावितरणच्या घरगुती व वैयक्तिक ग्राहकांच्या वीजबिलापोटी जुन्या पाचशे व एक हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येत आहेत. ग्राहकाच्या वीजबिलाच्या रकमेनुसार तितक्याच रकमेच्या जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येत आहेत. मात्र वीजबिलापोटी आगाऊ स्वरूपात (अ‍ॅडव्हान्स पेमेंट) स्वीकारण्यात येणार नाही. वीजबिलाचा भरणा करण्यासाठी महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात आले आहेत. या ५०१ वीजबिल भरणा केंद्रांत १० ते १४ नोव्हेंबपर्यंत ४६ कोटी पाच लाख रुपयांच्या वीजबिलाचा भरणा करण्यात आला.

वीजग्राहकांना त्वरित वीजबिल भरता यावे यासाठी आवश्यक पूर्वतयारीसह राज्यातील सर्वच केंद्रांवर महावितरणच्या नियमित कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी दिवसभर जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी ग्राहकांचे अर्ज भरून देण्यास सहकार्य करीत आहेत. हे अर्ज महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याशिवाय घरबसल्या ऑनलाइन वीजबिल भरण्यासाठी महावितरणचे www.mahadiscom.in संकेतस्थळ व मोबाइल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध आहे.