विजेसंदर्भात काही तक्रार असल्यास पूर्वी ग्राहक ‘महावितरण’च्या तक्रार निवारण केंद्रांमध्ये जाऊन थेट तक्रार नोंदवू शकत होता. मात्र, ही केंदं्रच ‘महावितरण’ने बंद केली व टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविण्याचा पर्याय दिला. पण, वीज ग्राहकांमधील गोंधळ वाढला!
आधुनिकतेच्या दृष्टीने व ग्राहकाच्या प्रत्येक तक्रारीची नोंद होण्यासाठी हे पाऊल स्वागतार्ह असले, तरी अद्यापही बहुतांश वीजग्राहक तितका ‘आधुनिक’ न झाल्याने ही तक्रार नेमकी कशी नोंदवायची याबाबत संभ्रम आहे. त्यामुळेच टोल फ्री क्रमांक देऊन ‘महावितरण’ टेन्शन फ्री झाले असले तरी ग्राहकांचा गोंधळ मात्र वाढला आहे.
राज्यासह पुणे परिमंडलातील सर्व स्थानिक तक्रार निवारण केंद्रे फेब्रुवारीपासून बंद करण्यात आली आहेत. आता विजेबाबत कोणतीही तक्रार नोंदवायची असेल, तर टोल फ्री क्रमांक देण्यात आले आहेत. शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातील वीजग्राहकांना कोणत्याही कंपनीच्या मोबाईल किंवा दूरध्वनीवरून संपर्क साधून तक्रार देता येईल. ग्राहकांना या व्यवस्थेच्या माध्यमातून कोणत्याही वेळेला तक्रार नोंदविता येईल, अशीही व्यवस्था करण्यात आली आहे. शहरामध्ये त्यासाठी ४० सीटर अत्याधुनिक ग्राहक सेवा केंद्र उभारण्यात आले आहे. प्रामुख्याने खंडित वीजपुरवठय़ासह वीजसेवेशी संबंधित इतर तक्रारी स्वीकारण्यासाठी हे टोल फ्री कॉल सेंटर कार्यरत आहे. इंटरॅक्टीव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टीमद्वारेही (आयव्हीआरएस) वीजग्राहकांना मराठी, हिंदूी व इंग्रजीमध्ये तक्रार नोंदविण्याचे व्यवस्था करण्यात आली आहे.
कारभार अत्याधुनिक व अधिक प्रभावी करण्याचा उद्देश यामागे असला, तरी बहुतांश ग्राहकांना अद्यापही या यंत्रणेचा परिचय नाही. ग्रामीण भागाबरोबरच शहरातही असा ग्राहक मोठय़ा प्रमाणावर आहे. टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तक्रार नोंदवायची असेल, तर ग्राहक क्रमांक देणे आवश्यक आहे. त्या शिवाय कॉल सेंटरच्या तांत्रिक प्रणालीमध्ये तक्रारींची नोंद होऊ शकणार नाही, अशी व्यवस्था आहे. हा ग्राहक क्रमांक प्रत्येक बिलावर असतो. पण, वेळप्रसंगी हा क्रमांकही न सापडण्याची स्थिती निर्माण होते. काहींना या यंत्रणेचा फारसा परिचय नसतो. अशा वेळेस तक्रार कशी करावी हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे तक्रारीबाबत काहीतरी पर्यायी व्यवस्था कायम ठेवून हळूहळू अत्याधुनिक पद्धतीचा वापर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
 
 

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

ग्राहकांना विजेबाबत तक्रार करायची असल्यास यापुढे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या १८००२३३३४३५ किंवा १८००२००३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे. ही तक्रार करण्यासाठी ग्राहक क्रमांकही संबंधित ग्राहकाला सांगावा लागणार आहे.
 
आंदोलनांची डोकेदुखी टळली

एक-दोन दिवस वीज गेली किंवा सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असताना ग्राहकांच्या रोषाला स्थानिक तक्रार निवारण केंद्रांना व तेथील कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत होते. विविध पक्षांचे स्थानिक कार्यकर्तेही विजेबाबतच्या विविध प्रश्नांसाठी अनेकदा याच केंद्रांवर मोर्चे घेऊन धडकत होते. केंद्रांची तोडफोड किंवा कर्मचाऱ्यांची धक्काबुक्की असे प्रसंगही यातून होत होते. केंद्र बंद झाल्याने ‘महावितरण’ची ही डोकेदुखी टळणार असली, तरी स्थानिक कार्यकर्त्यांच्या आंदोलनाचे एक हक्काचे केंद्र मात्र बंद झाले आहे.