आपल्या इमारतीलगत विजेचा ऑईल फिल्ड ट्रान्सफॉर्मर असेल, तर जरा सावधान..! कारण वेळोवेळी त्याची देखभाल होत नसल्यास विजेची गरज भागविणारा हा ट्रान्सफॉर्मर कोणत्याही क्षणी धोकादायक ठरू शकतो.. महावितरण कंपनीला याबाबतची माहिती आवश्य द्या, पण त्याची दखल घेतली जाईलच असे नाही.. सदाशिव पेठेतील इंद्रायणी अपार्टमेंटमधील रहिवाशांनी नुकताच त्याचा अनुभव घेतला. अनेकदा तक्रारी करूनही इमारतीजवळील ट्रान्सफॉर्मर हलविला गेला नाही. १४ जूनला दुपारी या ट्रान्सफॉर्मरचा अक्षरश: स्फोट झाला.. आग लागून इमारतीतील सदनिकांमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कुणाला इजा झाली नसली तरी ट्रान्सफॉर्मरच्या रूपातील असे ‘छुपे बॉम्ब’ अनेक ठिकाणी असून, नागरिकांसाठी ते धोकादायक बनले आहेत.
ऑईलचा वापर करावा लागणारे ऑईल फिल्ड ट्रान्सफॉर्मर शहरात अनेक ठिकाणी आहेत. असे ट्रान्सफॉर्मर इमारतींच्या किंवा लोकवस्तीच्या भागामध्ये बसविण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. ऑईल ट्रान्सफॉर्मरची योग्य पद्धतीने देखभाल न झाल्यास त्याचा स्फोट होऊन आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे निवासी भागांमध्ये ड्राय पद्धतीतील ट्रान्सफॉर्मर बसविणे गरजेचे आहे. विजेची गरज सर्वानाच आहे. मात्र, तिचा पुरवठा किंवा वापर करताना तितकीच काळजी घेतली गेली पाहिजे. शहरात अनेकदा ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याच्या घटना घडतात. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचे ढोबळ कारण त्याबाबत सांगितले जाते. मात्र, अनेकदा देखभाल- दुरुस्तीतील कमी व तांत्रिक त्रुटी हे या मागील कारण असते.
इंद्रायणी सोसायटीतील ट्रान्सफॉर्मर इमारतीच्या अगदी जवळ असल्याने तेथील रहिवाशांनी तो मोकळ्या जागेत हलविण्यासाठी १९९३ पासून सातत्याने मागणी केली होती. मात्र, पूर्वीच्या वीज कंपनीने व आताच्या ‘महावितरण’नेही त्याची दखल घेतली नाही. १४ जूनला ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन त्याला आग लागली तेव्हाच हा विषय पुन्हा चर्चेला आला. मागणी असून व धोकादायक झाला असतानाही हा ट्रान्सफॉर्मर का हलविला गेला नाही. त्याची वेळोवेळी देखभाल केली जात होती का, असे प्रश्न सध्या विचारले जात आहेत. वीज पुरवठादार म्हणून महावितरण कंपनीची याबाबत जबाबदारी आहेच, पण ऑईल ट्रान्सफॉर्मर इमारतीच्या शेजारी असण्यास परवानगी देणारी व वेळेवेळी तपासणी करणारी वीज निरीक्षकांची यंत्रणाही त्याला जबाबदार आहे.
नुकसान भरपाई अधिकाऱ्यांच्या वेतनातून कापा
नागरी वस्तीत असलेले व यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे धोकादायक झालेले ट्रान्सफॉर्मर तातडीने हाटवून सुरक्षित यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सजग नागरिक मंचचे अध्यक्ष व वीज क्षेत्रातील अभ्यासक विवेक वेलणकर यांनी याबाबत ‘महावितरण’च्या मुख्य अभियंत्यांना पत्र दिले आहे. इंद्रायणी अपार्टमेंटमधील ट्रान्सफॉर्मरची देखभाल वेळच्यावेळी होत होती का, याची चौकशी करावी. निरपराध नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी. घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वेतनातून ही नुकसान भरपाई कापण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
———–
ट्रान्सफॉर्मर मोकळ्या जागेत बसवावा, अशी मागणी आम्ही गेली वीस वर्षांहून अधिक काळ करीत होतो. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. ट्रान्सफॉर्मरच्या देखभालीकडेही दुर्लक्ष होते. आगीच्या घटनेमुळे घरातील अनेक वस्तू जळाल्याने मोठे नुकसान झाले. आता हा ट्रान्सफॉर्मर मोकळ्या जागेत हलविला पाहिजे व योग्य नुकसान भरपाई मिळावी, ही आमची मागणी आहे.
शौनक कुलकर्णी
इंद्रायणी अपार्टमेंट, रहिवाशी