वीजबिल भरूनही वीजजोड तोडणे व आगाऊ बिल जमा केले असतानाही वीज तोडण्याची नोटीस देण्याचा प्रकार तांत्रिक चुकीतून झाला असल्याचे स्पष्ट करीत ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान, ‘‘माझ्याबाबत हा प्रकार झाल्याने मोठय़ा बातम्या आल्याने अधिकाऱ्यांनी दखल घेतली, पण सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाबाबत व त्यांच्या समस्या सुटण्यासाठी ठोस उपाय झाले पाहिजेत,’’ अशी मागणी डॉ. गाळगीळ यांनी मांडली.
डॉ. गाडगीळ यांच्या नावे असलेल्या वीजजोडाचे वीजबिल आगाऊ भरण्यात आले असतानाही त्यांना वीजपुरवठा तोडण्याची नोटीस देण्यात आली होती. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या वीजजोडाचे बिल ऑनलाईन भरले असतानाही शनिवारी त्यांचा वीजपुरवठा तोडण्यात आला होता. महावितरणच्या भोंगळ कारभाराचे ठळक वृत्त सोमवारी प्रकाशित झाल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी डॉ. गाडगीळ यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त केली.
डॉ. गाळगीळ यांच्याबाबत झालेला प्रकार तांत्रिक पद्धतीतून झाला असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. याबाबत माहिती-तंत्रज्ञान विभागाशी संपर्क साधून यंत्रणेत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे एखाद्या ग्राहकाने ऑनलाईन वीजबिल भरले असल्याचे सांगितल्यास त्यावर कारवाई होऊ नये, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या असल्याचे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले.
ग्राहक पंचायतीशी संपर्काचे आवाहन
नोटीस न देता वीजपुरवठा खंडित करणे हा गुन्हा आहे. वीजग्राहकांची छळवणूक करणारे असे काही प्रकार झाल्यास अंतर्गत तक्रार निवारण केंद्रात अनेकदा योग्य न्याय मिळत नाही. या प्रकरणी संबंधितांना धडा शिकविण्यासाठी वीजग्राहकांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीमध्ये तक्रार दाखल करावी, असे आवाहन पंचायतीचे पुणे कार्याध्यक्ष व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पाठक यांनी केले. ग्राहक पेठेमध्ये पंचायतीचे कार्यालय असून, तेथे संपर्क साधल्यास ग्राहकांना न्याय मिळवून देऊ, असेही पाठक म्हणाले.