राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष महेश लांडगे यांनी भोसरी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार विलास लांडे यांच्या विरोधातील बंडखोरी कायम ठेवली आहे. लांडगे यांना चारही प्रमुख पक्षांचे काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला असून, भोसरीतील या राजकीय भूकंपामुळे विलास लांडे यांच्यासह शिवसेनेच्या सुलभा उबाळे, भाजपचे एकनाथ पवार आणि मनसेचे सचिन चिखले अशा सर्वच उमेदवारांना धक्का बसला आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख विजय फुगे, भाजपचे शिरूर संपर्कप्रमुख बाळासाहेब गव्हाणे, मनसेचे शहरप्रमुख मनोज साळुंखे, राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने, शांताराम भालेकर, अरूणा भालेकर, सुरेश म्हेत्रे, मनसेचे नगरसेवक राहुल जाधव यांच्यासह या सर्व पक्षांचे काही आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी उघडपणे लांडगे यांना पािठबा दिला.
विलास लांडे यांच्यासाठी डोकेदुखी ठरणाऱ्या महेश लांडगे यांच्या बंडाविषयी राजकीय वर्तुळात उत्कंठा होती. सोमवारी पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या पािठब्यावर लढण्याची व ‘परिवर्तन’ मेळाव्याद्वारे लढा प्रारंभ करण्याची घोषणा लांडगे यांनी केली. लांडे यांचा पराभव हेच आमचे लक्ष्य असल्याचे सांगत माजी उपमहापौर सुदाम लांडगे, माजी नगरसेवक महादेव गव्हाणे, अंकुश पठारे, एकनाथ थोरात, अलका यादव, सुलोचना भोवरे, माऊली जाधव, भाईजान काझी, शेखर लांडगे, नंदू दाभाडे, संजय नेवाळे, अमृत सोनवणे, संजय गायकवाड, दत्ता परांडे, शैलेश मोरे आदींनी लांडगे यांना पािठबा दिला. ८० टक्के पदाधिकाऱ्यांनी शिफारस करूनही लांडगे यांना शिवसेनेने उमेदवारी न दिल्याच्या निषेधार्थ शहरप्रमुखपदाचा राजीनामा दिल्याचे विजय फुगे यांनी सांगितले. भोसरीत ‘नुरा कुस्ती’ होत असून तीनही उमेदवार आमदारांनीच निश्चित केल्याने खऱ्या पैलवानाला िरगणात उतरवल्याचे त्यांनी सांगितले. भोसरीत परिवर्तन करायचे आहे. मात्र, भाजपने चुकीचा उमेदवार दिल्याचे बाळासाहेब गव्हाणे यांनी सांगितले. विठ्ठलाला अंधारात ठेवून बडव्यांनी भलताच कारभार केला असून सक्षम उमेदवार डावलून आमदारांच्या सोयीचा उमेदवार दिल्याचा आरोप मनोज साळुंखे यांनी केला. १० वर्षांत लांडेंनी काहीही कामे केली नाहीत, दुसऱ्याच्या कामांचे आयते श्रेय घेतल्याची टीका सुदाम लांडगे यांनी केली. आमदारांनी घराघरात भांडणे लावल्याचे सांगत ‘लांडेमुक्त’ भोसरी करणार असल्याचे दत्ता साने यांनी सांगितले. लांडे यांनी जे पेरले, तेच उगवल्याची टिप्पणी भाईजान काझी यांनी केली.
 
‘मनसेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून देणगी’
राष्ट्रवादीने मनसेच्या उमेदवारीसाठी ५० लाख रुपये ‘देणगी’ दिल्याची शंका खुद्द मनसेचे शहराध्यक्ष मनोज साळुंखे यांनीच व्यक्त केली. भोसरीत मनसेचे २७ हजार मतदान आहे. सक्षम उमेदवार डावलून जाणीवपूर्वक सोपा उमेदवार दिला आहे. आमच्याविषयी काय निर्णय घ्यायचा, तो पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी घ्यावा. आम्ही आमचा निर्णय घेतला आहे, असे साळुंखे यांनी स्पष्ट केले.