भाजीपाल्याच्या २४८ गाडय़ांची आवक;  मार्केटयार्डतील मुख्य भाजीपाला बाजार बंदच

पुणे : गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग तसेच फळबाजार बंद असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मोशी, खडकी, उत्तमनगर, मांजरी हे चार उपबाजार सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उपबाजार बंद ठेवण्यात आल्याने शहरात भाजीपाल्याच्या तुटवडय़ाचा प्रश्न होता. या पार्श्वभूमीवर उपबाजार सुरू करण्यात आल्यानंतर गुरुवारी चार उपबाजारात एकूण मिळून २४८ गाडय़ांमधून भाजीपाल्याची आवक झाली.

उपबाजारांचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी (१५ एप्रिल ) सायंकाळी मोशी, खडकी, उत्तमनगर, मांजरीतील उपबाजार सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. उपबाजारातही संसर्गाला अटकाव घालण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच खरेदी-विक्री व्यवहारात सामाजिक अंतर पाळण्याचे (सोशल डिस्टन्सिंग) आवाहन करण्यात आले. उपबाजारात केवळ घाऊक खरेदीदारांना प्रवेश देण्यात येत आहे. बाजारघटकातील सर्वानी मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यानंतर बुधवारी रात्री चारही उपबाजारात भाजीपाल्यांच्या गाडय़ांची आवक झाली.

मोशी येथील उपबाजारात गुरुवारी भाजीपाल्याच्या १०३ तसेच मांजरी येथील उपबाजारात ११५ गाडय़ांची आवक झाली. खडकीतील बाजारात २१ गाडय़ा, उत्तमनगर येथील बाजारात ९ गाडय़ांची आवक झाली. बाजारात एकूण मिळून २४८ गाडय़ांची आवक झाली असून ५ हजार ४५० क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली आहे, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.