24 February 2019

News Flash

पावसाचे आगमन होताच कणसांना मागणी

पावसाळय़ाचे वेध लागताच खडकवासला, पानशेत धरण परिसर तसेच सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

गुलटेकडीतील मार्केट यार्डात आवक सुरू

पावसात चिंब भिजल्यानंतर गरमागरम कणीस खाण्याचा मोह अनेकांना होतो. पावसाळय़ात कणसांना खवय्यांकडून मोठी मागणी असते. गुलटेकडीतील मार्केट यार्डात नाशिक, खेड, नारायणगाव भागातून कणसांची आवक सुरू  झाली.

पावसाळय़ाचे वेध लागताच खडकवासला, पानशेत धरण परिसर तसेच सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. लोणावळा, खंडाळा भागात पुणे-मुंबईसह राज्यातील वेगवेगळय़ा भागातून पर्यटक पावसाळय़ात आवर्जून येतात. पावसात चिंब भिजल्यानंतर गरमागरम कणीस खाण्याचा मोह होतो. खडकवासला धरण, लोणावळा, खंडाळा परिसरात कणीस विक्रेते त्यांच्या गाडय़ा लावतात. पुणे शहरातील विविध पुलांवर कणीस विक्रेत्यांनी  गाडय़ा लावल्या आहेत. गुलटेकडीतील मार्केट यार्डातील घाऊक बाजारात कणसांची आवक सुरू झाली आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो कणसाला १२ ते १५ रुपये असा दर मिळत आहे.

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दररोज चारशे ते पाचशे पोती कणसांची आवक होत आहे. गेल्या आठवडय़ात घाऊक बाजारात प्रतिकिलो कणसाला ८ ते १० रुपये असा दर मिळत होता. पावसाळय़ाचे वेध लागताच कणसांच्या दरात वाढ झाली आहे. पुणे शहर तसेच जिल्हय़ातील किरकोळ विक्रेत्यांकडून कणसांना मागणी वाढली आहे, अशी माहिती मार्केट यार्डातील मका कणसाचे व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माउली आंबेकर यांनी दिली. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत कणसाच्या दरात किलोमागे चार ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. पावसाने जोर धरल्यास राज्यासह पुणे विभागातून कणसाची आवक वाढेल. हातगाडीवर भाजलेल्या एका कणसाची विक्री २० ते २५ रुपयांना केली जात आहे, असे सुपेकर यांनी सांगितले.

बारमाही हंगाम

मका कणसांचा हंगाम वर्षभर सुरू असतो. पावसाळा आणि हिवाळय़ात कणसांना मोठी मागणी असते. कणसांपासून कॉर्न भेळ, सूप, कॉर्नपीठ असे पदार्थ तयार केले जातात. पूर्वी कणसांना पावसाळय़ात मागणी असायची. आता मात्र कणसांना वर्षभर मागणी असते. कणसांपासून विविध पदार्थ तयार केले जातात. हॉटेल चालक तसेच गृहिणींकडून कणसांना वर्षभर मागणी असते. मका पीठ, कणीस पौष्टिक असल्याने कणसांना वर्षभर मागणी असते, असे कणसांचे व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले.

First Published on June 13, 2018 2:32 am

Web Title: maize demand increases monsoon