करोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भीषण आग लागली आहे. केंद्र सरकारकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या मर्यादित वापराला परवानगी देण्यात आली असून लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष सध्या सीरम इन्स्टिट्यूटकडे लागली आहे. दरम्यान या आगीमुळे ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या निर्मितीवर परिणाम होणार का ? अशी चिंता सतावत आहे.

मांजरी येथे १०० एकरात असणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली असून चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली आहे. या ठिकाणी सीरमकडून अनेक सुविधा उभारल्या जात आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी उपस्थित आहेत. दरम्यान सुदैवाने ‘कोव्हिशिल्ड’ लसीची निर्मिती होणारं ठिकाण सुरक्षित असल्याचं सीरमकडून सांगण्यात आलं आहे.

मांजरी येथील या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतली जाणारी बीसीजी लस तयार केली जाते. त्या विभागाला ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. महत्वाचं म्हणजे करोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लस तयार केली जाते तेथून हा भाग काही अंतरावर आहे. सुदैवाने अद्याप आगीची झळ तिथपर्यंत पोहोचलेली नाही. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून मोठ्या प्रमाणात आगीचे लोट दिसत आहेत. यामुळे घटनास्थळी लोकांनी गर्दी केली आहे.

अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पाच मजल्यांची इमारत असून तीन माळ्यांवर आग पसरली आहे. धुराचं प्रमाण जास्त आहे. चार लोक अडकल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. तिघांना आम्ही सुखरुप बाहेर काढलं असून अजून शोध सुरु आहे. १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. यामध्ये नेमकं काय मटेरिअल आहे याची माहिती मिळवत आहोत. धूर कमी होत नाही तोवर आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण आहे”.