22 October 2019

News Flash

आमदार अनंत गाडगीळ यांची काँग्रेस बळकट अभियानाची घोषणा

पुणे शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते सध्या भांबावलेले असून हतबल झाल्यासारखी त्यांची स्थिती आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी नव्या वर्षांत काँग्रेस बळकट अभियान

| December 28, 2014 02:35 am

पुणे शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते सध्या भांबावलेले असून हतबल झाल्यासारखी त्यांची स्थिती आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी नव्या वर्षांत काँग्रेस बळकट अभियान सुरू करणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार अनंत गाडगीळ यांनी शनिवारी जाहीर केले.
नुकत्याच संपलेल्या विधान परिषदेच्या अधिवेशनातील कामकाजाचा आढावा गाडगीळ यांनी शनिवारी सादर केला. तसेच नव्या अभियानाचीही माहिती दिली. काँग्रेसचा कार्यकर्ता वैचारिकदृष्टय़ा सध्या गोंधळलेला आहे. त्यामुळे शहरातील कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी आणि पक्ष बळकट करण्यासाठी अभियान सुरू करणार असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. या अभियानात दर आठवडय़ात दोन या पद्धतीने वॉर्डनिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. तसेच डॉक्टर, वकील, व्यावसायिक संस्था-संघटना यांच्याशी संपर्क साधून त्यांचेही प्रश्न मी समजून घेणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना पत्र पाठवून त्या मार्गानेही संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे, असे गाडगीळ यांनी सांगितले. पक्षसंघटना बळकट करण्याचा हा कार्यक्रम पूर्णत: वैयक्तिक स्वरूपाचा असून त्यात शहर काँग्रेसला सहभागी करून घेणार नसल्याचेही ते म्हणाले.
आमदार निधीच्या माध्यमातून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल, उपेक्षित विद्यार्थी ज्या शाळांमध्ये शिकतात अशा शाळांना संगणक देणे, शहरात नगरसेवकांशी चर्चा करून महिला शौचालये उभारणे, ग्रंथालयांना मदत, शहरातील रस्त्यांचे सुशोभीकरण आदी विधायक कामांना मदत करणार असल्याची माहिती देऊन गाडगीळ म्हणाले की, नदीकाठचा विकास आणि वाहतूक सुधारणा या दोन विषयांमध्येही तज्ज्ञ, अभ्यासक, वास्तुरचनाकार, चित्रकार आदींच्या सहभागाने विशेष योजना राबवणार आहे. वाहतुकीचा आणि पार्किंगचा प्रश्न सोडवायचा असेल, तर शहरात फ्री ग्राऊंड फ्लोअर ही संकल्पना राबवणे आवश्यक असून यापुढे होणाऱ्या नव्या बांधकामांमध्ये केवळ अत्यावश्यक दुकाने तळमजल्यावर आणि अन्य सर्व दुकाने पहिल्या मजल्यावर अशी रचना केल्यास पार्किंगसाठी अनेक ठिकाणी जागा उपलब्ध होतील.
बेकायदेशीर बांधकामे, पुण्यात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची गरज, पुण्यातील रिक्त असलेले धर्मादाय आयुक्तांचे पद, पुण्याची सार्वजनिक वाहतूक यांसह अनेक विषय अधिवेशनात उपस्थित करून त्यावर चर्चा घडवून आणल्याचीही माहिती गाडगीळ यांनी दिली.

First Published on December 28, 2014 2:35 am

Web Title: make strong congress campaign by anant gadgil
टॅग Campaign,Pune 2