News Flash

सर्वसामान्यांनाही अनुकरणीय असे आदर्श व्यक्तित्व घडवा – राज्यपाल के. शंकरनारायणन यांची अपेक्षा

देशाचे संरक्षण करण्याबरोबरच सर्वसामान्य लोकांनी अनुकरण करावे असे आदर्श व्यक्तित्व घडवावे, अशी अपेक्षा राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी गुरुवारी व्यक्त केली.

| May 31, 2013 03:00 am

अद्ययावत तंत्रज्ञान आणि नेतृत्वगुणांच्या आधारे देशाचे संरक्षण करण्याबरोबरच सर्वसामान्य लोकांनी अनुकरण करावे असे आदर्श व्यक्तित्व घडवावे, अशी अपेक्षा राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी गुरुवारी व्यक्त केली.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १२४ व्या तुकडीतील २९१ स्नातकांना राज्यपालांच्या हस्ते पदवीप्रदान करण्यात आली. ‘एनडीए’चे प्रमुख  कमांडंट एअर मार्शल के. पी. गिल, उपप्रमुख रिअर अॅडमिरल आनंद अय्यर, प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला या प्रसंगी उपस्थित होते. बी. एस्सी (संगणकशास्त्र) पदवी संपादन करणाऱ्या जी. एस. सुमन याला कमांडंट रौप्यपदकासह सवरेत्कृष्ट स्नातकाचा चषक प्रदान करण्यात आला. विज्ञान शाखेत प्रथम आलेल्या गौरव कुमार आणि सामाजिकशास्त्रे विषयात प्रथन आलेल्या अमन ठाकूर या स्नातकांना रौप्यपदकाने गौरविण्यात आले. १३२ स्नातकांना बी. एस्सी, ६२ स्नातकांना बी. एस्सी (संगणकशास्त्र) आणि १०३ स्नातकांना बी.ए. पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये दहा परदेशी स्नातकांचा समावेश आहे.
प्रबोधिनीने राष्ट्राची सेवा करणारे अनेक लष्करी अधिकारी घडविले आहेत. दूरदृष्टी, उच्च दर्जाची शैक्षणिक गुणवत्ता आणि कडक शिस्त यामुळे ‘एनडीए’चा देशभरात आदराने आणि अभिमानाने गौरव केला जातो. एनडीए महाराष्ट्रामध्ये आहे हे आपल्यासाठी भूषण असल्याचे सांगून के. शंकरनारायणन म्हणाले, युद्धाच्या काळामध्ये आणि शांततेच्या काळातही लष्कराने देशाची उत्तम सेवा केली आहे. या परंरपरेचे आणि देशसेवेचा पाईक होऊन प्रशिक्षण पूर्ण करण्याचे खडतर काम स्नातकांनी साध्य केले आहे. येथील शिक्षण आणि प्रशिक्षणातून लष्कराचे नेतृत्व करणारे भावी अधिकारी घडणार आहेत.
पदवी ही आपल्या आपल्या जीवनाची सुरुवात आहे. ज्ञान संपादनाची प्रक्रिया निरंतर असते. सातत्याने होणारा बदल हाच स्थायी असल्यामुळे आपल्यालाही त्यानुसार बदलावे लागेल. तंत्रज्ञानाचा अंगीकार करून शिक्षण घेत आपल्याला प्रशिक्षित घडविण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. आव्हाने ही एक संधी आहे हे ध्यानात घेऊन कामामध्ये बदल घडवावेत. अद्ययावत तंत्रज्ञान आणि नेतृत्वगुणांच्या आधारे तुम्ही देशाचे नेतृत्व कराल. पण, सर्वसामान्य लोकांनीही तुमचे अनुकरण करावे असा आदर्श घडविला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
के. पी. गिल यांनी राज्यपालांना स्मृतिचिन्ह प्रदान केले. प्राचार्य शुक्ला यांनी शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. आनंद अय्यर यांनी आभार मानले.
सुमनला जायचे हवाई दलात
सवरेत्कृष्ट स्नातकाचा बहुमान पटकाविणारा बंगळूरु येथील जे. एस. सुमन याला हवाई दलामध्ये फायटर पायलट होण्याची इच्छा आहे. पुढील प्रशिक्षणासाठी तो हैदराबाद येथील एअर फोर्स अॅकॅडमीमध्ये दाखल होणार आहे. सुमन आणि गौरव कुमार हे दोघेही बंगळुरू येथील इंडियन राष्ट्रीय मिलिटरी अॅकॅडमीमध्ये होते. ‘आयआयटी’मध्ये पात्र ठरूनही चांगल्या करिअरची संधी म्हणून तो ‘एनडीए’मध्ये दाखल झाला. आर्मी ऑफिसर होण्याची इच्छा असल्याचे गौरवने सांगितले. गौरव हा बिहारमधील बक्सर येथील रहिवासी आहे. तर, हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील अमन ठाकूर याला पायदळामध्ये सहभागी व्हायचे आहे. ‘एनडीए’तील प्रशिक्षणामध्ये खूप काही शिकण्याची संधी लाभली असून भावी जीवनात त्याचा उपययोग होईल, अशी भावना तिघांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 3:00 am

Web Title: make your personality imitable for commonmen k shankarnarayanaan
Next Stories
1 पंचावन्न रुपयांची कंपासपेटी खरेदी केली शहात्तर रुपयांना
2 नयना पुजारी खून खटला: अखेर योगेश राऊत पोलिसांच्या तावडीत
3 सलाइनच्या बाटलीत बुरशी!
Just Now!
X