एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटनाला पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी काम करणारी मलाला युसुफझई येणार असल्याची घोषणा हा केवळ गवगवाच ठरला. कारण ती पुण्यात येणार असल्याचे जाहीर करून आयोजकांनी सर्वानाच ‘कात्रजचा घाट’च दाखवला आहे. इतकेच नव्हे तर यावर्षीच्या छात्र संसदेचे आकर्षण असलेल्या मलाला युसुफझई, आंग स्यान स्यू की आणि डॅनियल रॅडक्लिफ हे तिन्ही वक्ते छात्र संसदेमध्ये प्रत्यक्षात सहभागी नाहीत, तर ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
मलाला युसुफझई, म्यानमारच्या विरोधी पक्ष नेत्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या आंग स्यान स्यू की आणि डॅनिअल रॅडक्लिफ हे तिघेही पुण्यात येणार हे विद्यार्थ्यांसाठी मोठे आकर्षण होते. तसे पत्रकार परिषदेत जाहीरही करण्यात आले होते. त्यामुळे या तिघांबाबत, विशेषत: मलाला हिच्याबाबत मोठी उत्सुकता होती. मात्र, हे तिघेही प्रत्यक्ष सहभागी न होता, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. स्यू की बाबत गेल्या वर्षीही असे झाले होते.
मात्र, या तिघांचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्यावर एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसदेचे प्रमुख निमंत्रक राहुल कराड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, ‘‘मलाला येणार असे आम्ही म्हटले नव्हते, तर ती संवाद साधणार असे म्हटले होते. या तिघांनीही प्रत्यक्ष सहभागी व्हावे म्हणून आम्ही प्रयत्न केले. मात्र, काही कारणास्तव हे तिघेही प्रत्यक्ष सहभागी होऊ शकणार नाहीत.’’
चौथी भारतीय छात्र संसद शुक्रवारपासून (१० जानेवारी) सुरू होत आहे. त्याच्या उद्घाटनाला युवक कल्याण विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्रसिंग, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, पर्यावरणवादी कार्यकर्त्यां सुनीता नरेन, ट्रॅप शूटर रंजन सोदी आदी उपस्थित राहणार आहेत.