News Flash

पुनर्वसित माळीणच्या कामांबाबत कारवाई नाही

गेल्या वर्षी पावसाळा संपल्यानंतर गावात ऑक्टोबरमध्ये अंतिम डागडुजीची कामे करण्यात आली होती

प्रशासनाचे तांत्रिक बाबींवर बोट

पहिल्याच पावसात पुनर्वसित माळीण गावातील घरांच्या भिंतींना तडे गेले असून भराव घातलेली माती वाहून गेली आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून संबंधित ठेकेदार किंवा प्रकल्प सल्लागार यांना अद्यापही दोषी धरण्यात आलेले नाही. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आलेली नाही. कारवाईबाबत जिल्हा प्रशासनाकडून केवळ तांत्रिक बाबींवर बोट ठेवण्यात येत आहे.

पुनर्वसित माळीणचे उद्घाटन होऊन अवघे तीन महिनेही झाले नाहीत तोच झालेल्या पहिल्या पावसात पुनर्वसित माळीणमधील नव्या घरांना भेगा पडल्या आणि विविध ठिकाणी रस्तेही खचले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून पावसाळा संपेपर्यंत विशेष तांत्रिक निरीक्षण पथकाची नेमणूक करण्यात आली. तसेच निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत संपूर्ण कामाची पाहणी करण्यात आली. मात्र, करारानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांसाठी एक आणि इतर कामांसाठी दोन वर्षांचे दायित्व ठेकेदाराकडे असल्याने त्याच्याकडून कामे करून घेण्यात येत असून त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली नाही.

गेल्या वर्षी पावसाळा संपल्यानंतर गावात ऑक्टोबरमध्ये अंतिम डागडुजीची कामे करण्यात आली होती. चार मीटर खोल भराव घालण्यात आला होता. मात्र, एकाच वेळी अनेक कामे सुरू असल्याने भराव घातलेली माती घट्ट बसलेली नव्हती, त्यामुळे पहिल्याच पावसात माती वाहून गेली. प्रत्यक्ष घरांच्या बांधकामांना धोका नसला, तरी घरांसमोर घातलेले भराव आणि आजूबाजूचे बांधकाम निकृष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच वॉटरप्रूफिंग न केल्याने मोठा पाऊस झाल्यानंतर घरांच्या छतांमधून पाणी गळत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. डोंगरउतारावर पुनर्वसन केल्याने मोठा पाऊस झाल्यानंतर काय परिणाम होईल, याचा अंदाज ठेकेदार किंवा प्रकल्प सल्लागार यांना न आल्याने पुनर्वसित कामांची वाताहात झाली आहे. जमिनीखाली दीड ते दोन मीटर खोल खड्डे खोदून मातीची तपासणी करण्यात आली. त्यानंतरच हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यामुळे बांधकामांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. मात्र, आजूबाजूची कामे निकृष्ट झाल्याने प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 5:11 am

Web Title: malin village issue malin village rehabilitation
Next Stories
1 पिंपरीत राष्ट्रवादीचे दबावतंत्र अयशस्वी
2 बहुसंख्य आधार केंद्रे बंदच
3 बाजारभेट : व्यवसायाबरोबरच श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक भान!
Just Now!
X