पुनर्वसित माळीणवासीयांच्या मनात अजूनही भीती; काही ग्रामस्थ अद्याप परतलेले नाहीत

‘पहिल्याच पावसात आमच्या घरासमोरील माती वाहून गेली आणि पाच-सहा फूट खोल खड्डा पडला.. त्यानंतर दगड, खडीचा भराव टाकण्यात आला; पण संततधार पावसामुळे तो भरावही खचला.. आता पुन्हा भराव टाकण्यात आला आहे. मात्र, पावसाला सुरुवात झाल्यानंतर अख्खे घरच खाली जाते की काय अशी भीती वाटते.. पुनर्वसित माळीणवासीयांच्या मनातील भावना सध्या अशा आहेत.

‘जोराचा पाऊस झाल्यानंतर घरांच्या भिंतींमधून पाणी झिरपते. घरांना काही झालेले नाही. परंतु, पावसाने घराभोवतीची माती खचण्याची भीती वाटते. सध्या गावात माती घसरू नये म्हणून दगड लावण्याचे काम सुरू आहे, बाकी कामे पावसाळ्यानंतर केली जाणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे,’ असे ग्रामस्थ सांगतात.

तीन वर्षांपूर्वी दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर माळीण गावचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्याततीन वर्षांपूर्वी दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर माळीण गावचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. आले. परंतु, पहिल्याच पावसात याही माळीणची वाताहत झाली. त्या घटनेला एक महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून गावात होणाऱ्या प्रचंड पावसामुळे पुनर्वसनाची कामे ठप्प झाली आहेत. पुनर्वसित कामांचा विचका झाल्यानंतर गेल्या महिनाभरात तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेल्या कामांवर ग्रामस्थांचा विश्वास नाही. गाव सोडून गेलेले काही कुटुंबीय अद्यापही गावात परतलेले नाहीत.  पुनर्वसित माळीण प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर तीन महिन्यात झालेल्या पहिल्या पावसात गावाची दैना उडाली आहे. त्यामुळे गावातील पाच कुटुंबांनी गावाच्या पायथ्याशी तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आसरा घेतला असून ते अद्यापही गावात परतलेले नाहीत.

रस्ते खचले

२४ आणि २५ जून रोजी गावात ९७ मिलिमीटर पाऊस झाल्याने पुनर्वसित माळीणमधील रस्ते खचले. घरांच्या भिंतींना तडे गेले. अंगणवाडीची भिंत कोसळली, सांडपाणी वाहिन्यांचे पाईप दबून गेले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून एक महिन्यात केवळ घरांच्या पायऱ्या दुरुस्त करणे, माती वाहून गेलेल्या ठिकाणी दगड, खडीचा भराव टाकणे, मोठय़ा प्रमाणात असलेल्या मोकळ्या जागेवर ताडपत्री टाकणे, अशी कामे करण्यात आली आहेत. घरांना वॉटर प्रुफिंग करणे, गावात पक्के रस्ते बांधणे, सीमाभिंत बांधणे, अंगणवाडीची पडलेली भिंत बांधणे आदी उर्वरित कामे पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहेत.