नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा चित्रपट सध्या तिकीट खिडकीवर धुमाकूळ घालत असताना या चित्रपटाची पायरेटेड कॉपी मोबाइल व सीडीच्या माध्यमातून शहरभर पसरली आहे. अशाच प्रकारे पायरेटेड कॉपी विकणाऱ्या एका मोबाइल दुरुस्तीच्या दुकानदाराला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री स्वारगेट परिसरातील जेधे चौकात असलेल्या एच. के. जी. एन. मोबाइल शॉपी येथे पोलिसांनी ही कारवाई केली.
कासम दस्तगीर शेख (वय २३, रा. इंदिरानगर खड्डा, गुलटेकडी) असे या प्रकरणात अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत राहुल नारायण मानकर (वय ३९, रा. राजेंद्रनगर, पीएमसी कॉलनी) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. जेधे चौकातील मोबाइल दुरुस्तीच्या एका दुकानामध्ये सैराट चित्रपट अनधिकृतपणे मिळवून तो नागरिकांना सीडी किंवा पेनड्राईव्हच्या माध्यमातून शंभर रुपयांत डाऊनलोड करून दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीची खातरजमा झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पोलीस पथकासह संबंधित दुकानावर छापा घातला. त्यावेळी सैराट चित्रपटाची पायरेटेड कॉपी नागरिकांना डाऊनलोड करून दिली जात असल्याची बाब उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी दुकानचालकाला अटक केली.