पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून पुण्यात कोंढवा येथे राहणाऱ्या मोहम्मद असगर (४०) या व्यक्तीने ट्रेन खाली उडी मारुन आत्महत्या केली. मृत व्यक्तीच्या वडिलांनी समर्थ नगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन असगरची पत्नी अश्मा शेख, तिची आई राजिया अन्सारी, भाऊ परवेझ अन्सारी आणि अश्माच्या प्रियकरांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पुणे मिररने हे वृत्त दिले आहे.

मोहम्मद असगरला आत्महत्येचा प्रवृत्त केल्या प्रकरणी चौघांविरोधात कलम ३०६,३२३, ५०४ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्माने आपल्यासोबत भांडण केले व स्वतंत्र रहायचे असा आपल्या मुलाकडे हट्ट धरला. त्यामुळे माझ्या मुलाने कोंढवा येथे फ्लॅट विकत घेतला. तिथे ते दोघे रहायचे. तिच्या छळाला कंटाळून माझ्या मुलाने घर सोडले व गेल्या १० महिन्यांपासून तो आमच्यासोबत राहत होता असे मोहम्मद असगरचे वडिल मोहम्मद शरीफ इस्माइल शेख यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.

अश्माने आपल्या पत्नीला मारहाण केली व तिच्या प्रियकराने माझ्या मुलाला असगरला मारहाण केली असा आरोप इस्माइल शेख यांनी केला. अश्मा आपल्या मुलाचा छळ करत होती. फ्लॅट तिच्या नावावर करण्यासाठी दबाव आणत होती असे इस्लाइल शेख यांचा आरोप आहे. पोलिसांना असगरकडे एक सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये त्याने आत्महत्येसाठी पत्नी, तिच्या प्रियकराला आणि तिच्या आईला जबाबदार धरले आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.