13 December 2017

News Flash

मुलाला अभियंता करण्यासाठी पाच कोटींची चोरी

टीएम केंद्रात जमा करण्यासाठी चालविलेली चार कोटी ९४ लाखांची रोकड घेऊन तो पसार देखील

प्रतिनिधी, पुणे | Updated: October 8, 2017 3:26 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

मुलाला अभियंता करण्यासाठी त्याने वडिलोपार्जित आठ ते दहा गुंठे जमीन विक्री केली. मात्र, तितक्यावरही न भागल्याने उभा राहिलेला कर्जाचा डोंगर.. अशा आर्थिक विवंचनेत सापडलेल्या त्याने गुन्हेगारी कृत्य करण्याचा निर्णय घेतला. एटीएम केंद्रात जमा करण्यासाठी चालविलेली चार कोटी ९४ लाखांची रोकड घेऊन तो पसार देखील झाला.अखेर तो कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात सापडला. कर्नाटक पोलिसांनी त्याच्याकडून चार कोटी ९४ लाख रुपयांची जप्त केली.

कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या जीपचालक बबन नारायण खेडेकर (वय ५२, रा. खेडेकर मळा, उरळी कांचन) याला अटक करण्यात आली आहे. सिक्युअर व्हॅल्यू इंडिया प्रा. लि. या कंपनीकडून हडपसर भागातील विविध बँकांच्या एटीएम केंद्रात रोकड जमा केली जाते. २९ सप्टेंबर रोजी कंपनीतील सुरक्षारक्षक जीपचालक खेडेकर याला घेऊन एटीएम केंद्रात रोकड जमा करण्यासाठी निघाले. त्यांच्याकडे नऊ कोटी रुपयांची रोकड भरणा करण्यासाठी देण्यात आली होती. दिवसभर रोकड जमा केल्यांतर त्यांच्याकडे चार कोटी ९४ लाखांची रोकड शिल्लक होती. रात्री आठच्या सुमारास हडपसर भागातील एका एटीएम केंद्रात रोकड जमा करण्यासाठी सुरक्षारक्षक उतरले.जीपचालक खेडेकर तेथून चार कोटी ९४ लाखांची रोकड घेऊन पसार झाला.

दरम्यान, खेडेकर पसार झाल्याचे निदर्शनास आल्याने या घटनेची माहिती हडपसर पोलिसांना दिली. शहरातून बाहेर जाणाऱ्या महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पडताळण्यात आले. तेव्हा खेडेकर जीप घेऊन सातारा रस्त्याने बंगळुरुच्या दिशेने गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने कर्नाटक पोलिसांना ही माहिती दिली. खेडेकरने त्याचा मोबाइल क्रमांक बंद केला होता. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याच्याकडील दुसरा मोबाइल क्रमांकाची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याआधारे तपास सुरू केला. तेव्हा तो कर्नाटकातील बंकापूर भागात असल्याची माहिती मिळाली. खेडेकरची मानलेली मुलगी तेथे राहत असल्याचे निष्पन्न झाले. कर्नाटक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.  त्याच्याकडून रोकड जप्त करण्यात आली. खेडेकरचा मुलगा अभियंता आहे. सध्या त्याला नोकरी नाही. मुलाच्या शिक्षणासाठी त्याने पैसे खर्च केले होते. त्यासाठी त्याने वडिलोपार्जित जमिनीची विक्री केली होती. त्याची पाश्र्वभूमी गुन्हेगारी नाही. आर्थिक विवंचनेमुळे त्याने गुन्हेगारी कृत्य केल्याचे निष्पन्न झाले

First Published on October 8, 2017 3:26 am

Web Title: man looted 5 crores from atm cash van to make his son engineer