‘नो एंट्री’त प्रवेश केल्याने कारवाई

पुणे : कोणतीही माहिती हवी असली, की प्रत्येक जण आता ‘गुगल सर्च’ करतो. त्यातही गुगल मॅपमुळे रस्ते किंवा वाहतूककोडींविषयी माहिती कळणे सोपे झाले आहे, मात्र पूर्णपणे तंत्रज्ञानावर चालणारे गुगल मॅप पुणे पोलिसांच्या वाहतूक व्यवस्थेविषयी अनभिज्ञ असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचाच फटका एका व्यक्तीला बसला आणि वाहतूक पोलिसांनी नो एंट्रीत प्रवेश केल्याबद्दल कारवाईला सामोरे जावे लागले. या प्रकारातून प्रत्येक वेळी ‘गुगल करणे’ उपयुक्त ठरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सध्या पुण्यात शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अनेक लोक परगावाहून पुण्यात दाखल झाले आहेत. त्यातील अनेकांना पुण्यातील रस्त्यांची माहिती नसते. त्यामुळे मध्यवर्ती पेठांमध्ये फिरण्यापासून शहरात कुठेही जाण्यासाठी ते गुगल मॅपचा आधार घेतात. गुगल मॅपवरून अंतर, रस्ते आणि वाहतुकीच्या कोंडीचा अंदाज सहजगत्या मिळतो. मात्र, शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत करण्यात आलेले बदल, विशेषत: ‘नो एंट्री’बाबतची माहिती गुगल मॅपवर मिळत नाही. सुनील होनमाने यांनाही गुगल मॅपमुळे फटका बसला. दुचाकीवरून ते सदाशिव पेठेतून नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर (फर्गसन महाविद्यालय रस्ता) येण्यासाठी निघाले होते. रस्ता माहीत नसल्याने त्यांनी गुगल मॅप सुरू केला. संभाजी पुलावर प्रवेश नसल्याची त्यांना कल्पना नव्हती आणि गुगल मॅप दाखवतो म्हणून त्यांनी तोच मार्ग कायम ठेवला. पूल ओलांडल्यावर त्यांना वाहतूक पोलिसांनी अडवले. सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत दुचाकींना पुलावर प्रवेश नसल्याचे स्पष्ट करून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.

होनमाने यांच्या या अनुभवावरून रस्त्यांच्या माहितीसाठी प्रत्येक वेळी ‘गुगल मॅप’चा आधार घेणे सोयीस्कर ठरत नाही हे स्पष्ट होते. त्याशिवाय ‘गुगल मॅप’चा आधार घेतला, तरी पुणे पोलीस आणि महापालिकेने रस्त्यावर नो एंट्री किंवा एकेरी वाहतुकीबाबत लावलेले फलक काळजीपूर्वक पाहणे आवश्यक असल्याचे दिसून येते.