लॉकडाउनमुळे दिल्लीत अडकून पडलेल्या कर्मचाऱ्यानं कंपनीनं दिलेले पैसे खर्च केले. मात्र, कर्मचाऱ्याकडून खर्च झालेले पैसे वसूल करण्यासाठी मालकानं चक्क त्याचं अपहरणच केलं. इतकंच नाही तर अपहरण केल्यानंतर कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्याचबरोबर त्याच्या गुप्तांगावर सॅनिटायझरही फवारलं. पुण्यात ही घटना घडली असून, पौंड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

३० वर्षीय व्यक्तीनं ही तक्रार दिली असून, मालकानं पैसे वसूल करण्यासाठी तीन माणसांच्या मदतीन अपहरण करून छळ केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. पेटिंग प्रदर्शन आयोजित करणाऱ्या कोथरूडमधील एका फर्ममध्ये तक्रारदार व्यक्ती मॅनेजर म्हणून काम करते. तक्रारदार व्यक्ती ऑफिसच्या कामानिमित्तानं दिल्लीमध्ये गेली होती. मात्र, तिथे गेल्यानंतर लॉकडाउन घोषित केल्यानं अडकून पडली. त्यामुळे त्याने तिथे राहण्यासाठी ऑफिसकडून देण्यात आलेले पैसे खर्च केले होते, असं पोलिसांनी सांगितलं.

त्यानंतर ७ मे रोजी ही व्यक्ती पुण्यात परतली. त्यानंतर तक्रारदाराला मालकानं १७ दिवसांसाठी एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन होण्यास सांगितले. मात्र, त्याच्याकडे पैसे नव्हते. चेक आऊट करण्यापूर्वीच तक्रारदारानं आपला फोन व डेबिट कार्ड तारण ठेवलं होतं. त्यानंतर १३ जून रोजी कंपनीच्या मालकानं आणि सहकाऱ्यांनी तक्रादाराकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर त्याला उचलून कारमध्ये डांबले.

तक्रादाराचं अपहरण केल्यानंतर त्याला कंपनीच्या ऑफिसमध्ये नेण्यात आलं. तिथे त्याला डांबून ठेवण्यात आलं. कंपनीच्या मालकासह इतर दोघांनी तक्रारदाराला मारहाण केली. तसेच त्याच्या गुप्तांगावर सॅनिटायझरही फवारलं व तक्रादाराला त्यांनी सोडून दिलं. तक्रारदारानं रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणात कोणलाही अटक झालेली नसून, पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.