रोजच्या जीवनातील लहान-लहान गोष्टींचे दाखले देत समोरच्याच्या मनाचा विचार करून समस्या कशा हाताळाव्यात याविषयी झालेली चर्चा, मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक व कलाकारांच्या आयुष्यात घडलेल्या काही प्रसंगांचे किस्से आणि जोडीला विषय उलगडणाऱ्या चित्रफिती.. अशा वातावरणात रविवारी ‘मनतरंग महोत्सव’ हा कार्यक्रम रंगला.
‘माय माईंड मॅटर्स’ आणि मॉडर्न महाविद्यालय या संस्थांतर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ‘कठीण प्रसंग हाताळण्याची गुरुकिल्ली’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. आनंद गोडसे, डॉ. मेधा कुमठेकर, लेफ्टनंट जनरल व्ही. एम. पाटील व विभावरी देशपांडे यांनी भाग घेतला. तर ‘माझे कुटुंब माझी शक्ती’ या विषयावर डॉ. उल्हास लुकतुके, डॉ. वनिता पटवर्धन व संयोगिता भावे यांनी मते मांडली. ‘सहभावनेची जादू’ या चर्चासत्रात हेमलता होनवाड, डॉ. अरुणा कुलकर्णी, मिलिंद फाटक व डॉ. सुखदा चिमोटे यांनी सहभाग नोंदवला. तर ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी सूत्रधाराची भूमिका बजावली.
सहभावनेबद्दल बोलताना डॉ. नाडकर्णी म्हणाले, ‘‘माणसात ‘आस्था’ (एम्पथी), ‘अनास्था’ (अपॅथी), ‘दुरास्था’ (अँटीपथी) आणि ‘अतिआस्था’ (सिंपथी) हे सारे आहे. सतत दुसऱ्याबाबत आस्थाच बाळगून राहणे शक्य नाही. जवळच्या माणसाला आस्था दाखवतानाही आपण कधी चुकू शकतो. अशा वेळी आपण घसरलो आहोत हे मान्य करा व ते दुरुस्त करा. ’’