पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये मंगळवारी मध्यरात्री एका अपघातात तिघांचा मृत्यू झाला.या तीन मित्रांचा अंत्यविधी संपवून घरी परतणाऱ्या आणखी एका केमिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संतोष थोरात असं त्यांचं नाव असून आज संध्याकाळी ६ वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळे फाटा येथील वडगाव आनंद जवळ स्विफ्ट डिझायर (एम एच- १४, डी एक्स-१२३१) ही कार  कठड्याला धडकून अपघात झाला. त्यानंतर कारने पेट घेतल्याने आगीत होरपळून तिघांचा जळून मृत्यू झाला. ज्यानंतर आता त्यांच्या चौथ्या मित्राचाही मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

संतोष थोरात हे आळेफाटा या ठिकाणाहून निघाले आणि अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. संतोष थोरात यांना खासगी रूग्णालयात दाखवून त्यांना उपचारासाठी चाकणला नेले जात होते, त्याचवेळी नारायणगाव ते मंचर या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये मंगळवारी मध्यरात्री अपघात झाला होता. या अपघातात स्विफ्ट डिझायर या गाडीने पेट घेतला. गाडी कठड्याला जोरात धडकल्यामुळे कदाचित तिघेही जण बेशुद्ध पडले असावेत. त्यामुळे तिघांपैकी एकालाही गाडीतून बाहेर निघण्यासाठी वेळ मिळाला नाही. परिणामी आगीत होरपळून तिघांचा मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची फारशी वर्दळही नव्हती. त्यामुळे बराच वेळ हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही.

नरेश सखाराम वाघ,दिलीप चंद्रकांत नवले आणि प्रशांत चासकर अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. आता या तिघांचा मित्र संतोष थोरात यांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.