शहराच्या मध्यभागात वाहने लावण्यास जागा उपलब्ध नसताना मंडई भागात असलेल्या दोन वाहनतळांपैकी एक वाहनतळ अचानक बंद झाल्याने अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे मंडई परिसरात गेल्या आठवडय़ापासून कोंडी होत आहे. वाहनतळ चालविणाऱ्या ठेकेदाराने थकबाकी न भरल्याने महापालिकेने वाहनतळाला टाळे लावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहराच्या मध्यभागात दररोज मोठय़ा संख्येने नागरिक खरेदीसाठी येतात. तुळशीबाग, मंडई, लक्ष्मी रस्ता परिसराला बाहेरगावाहून येणारे नागरिक आवर्जुन भेट देतात. मंडई भागात हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ (आर्यन पार्किंग) आणि कै. सतीशशेठ मिसाळ वाहनतळ (मिनव्‍‌र्हा पार्किंग) हे दोन वाहनतळ आहेत. लक्ष्मी रस्त्यावर नारायण पेठेत हमाल वाडा परिसरात कै. शिवाजीराव आढाव आणि मोदी गणपतीजवळ क्रीडामहर्षी हरिभाऊ साने वाहनतळ आहे. मध्यभागात दुचाकी तसेच चारचाकी वाहने घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या सोईसाठी वाहनतळ सुरू करण्यात आले आहे. शहराच्या मध्यभागात शनिवारी तसेच रविवारी मोठय़ा संख्येने नागरिक खरेदीसाठी येतात. सणासुदीच्या काळात तर या भागात पाय ठेवायला जागा नसते.

मध्यभागातील चारही वाहनतळांवर परिसरातील रहिवासी तसेच व्यावायिकांनी वाहने लावल्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी बऱ्याचदा वाहने लावण्यास जागा उपलब्ध नसते. शनिवारी तसेच रविवारी मंडईतील दोन्ही वाहनतळांवर सकाळीच ‘पार्किंग फुल आहे,’असा फलक  लावला जातो. मंडईतील कै. सतीशशेठ मिसाळ वाहनतळ चालविणाऱ्या ठेकेदाराने महापालिकेची थकबाकी न भरल्याने ८ ऑगस्ट रोजी महापालिकेने वाहनतळाचा ताबा घेऊन टाळे ठोकले. ठेकेदाराकडे ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या काही वर्षांपासून थकबाकी न भरल्याने टाळे ठोकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मंडईत कोंडी; बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

मंडईतील वाहनतळ बंद झाल्यानंतर सध्या या भागात एकाच वाहनतळावर वाहने लावण्यास जागा उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक मोटारचालक तसेच दुचाकीस्वार सम-विषम दिनांक न  पाहता जागा मिळेल तेथे वाहने लावतात. अशा वाहनांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असून मंडईत खरेदीसाठी मोठी गर्दी होते.गणेशोत्सवात मध्यभागातील मानाच्या मंडळांच्या ‘श्रीं’चे दर्शन घेण्यासाठी पुण्यातूनच नव्हे, तर बाहेरगावाहून मोठय़ा संख्येने नागरिक येतात. अनेक जण मंडईतील वाहनतळावर मोटारी लावतात. मंडईतील वाहनतळ बंद असल्याने गणेशोत्सवात मोटारी घेऊन येणाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.

मंडईतील वाहनतळ बंद केल्याने या भागात सध्या वाहने लावण्यास पुरेशी जागा उपलब्ध नाही. वाहनचालक बेशिस्तपणे वाहने लावतात. त्यामुळे काही दिवसांपासून मंडईत कोंडी होत आहे. गणेशोत्सवापूर्वी वाहनतळ सुरू करण्याची गरज आहे.

– अनिल नलावडे, पोलीस निरीक्षक, विश्रामबाग वाहतूक शाखा