अनेक मंडळांकडून नियमांची पायमल्ली; वाहतुकीचा बोजवारा

गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला असून शहराच्या मध्यभागात अनेक ठिकाणी रस्ते व्यापणारे मांडव टाकण्यात आले आहेत. भव्य-दिव्य देखाव्यांच्या नावाखाली अनेक मंडळांकडून सरसकट नियमांची पायमल्ली करण्यात आली असून मांडवांमुळे मध्यभागात वाहतूक कोंडी होत आहे. देखाव्यांचे काम भरदिवसा रस्त्यावर सुरू असल्याने वाहतुकीच्या कोंडीत भर पडत आहे.

शहरातील मध्य भागात पंधरा दिवसांपूर्वी मांडव उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मध्यभागातील अनेक मंडळांनी उभारलेल्या मांडवाचा आकार मोठा आहे. अनेक मंडळांच्या मांडवांनी रस्ते व्यापून टाक ले आहेत. गेल्या आठवडय़ापासून देखाव्यांचे काम सुरू झाले आहे. देखाव्यांचे काम दिवसा सुरू राहात असल्याने पेठांमधील भागात वाहतूक कोंडी होत आहे. अनेक मंडळांकडून मांडव रस्त्यापासून काही उंचीवर उभारण्यात आले आहेत. वाहतुकीला अडथळा नको, म्हणून असे दुमजली मांडव उभारले असल्याची सारवासारव मंडळांकडून केली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात मांडवाखालून जाण्यासाठी अगदी छोटा रस्ता (बोगदा) ठेवण्यात आला आहे. अरुंद गल्ल्यांमध्ये इमारतींना लागून मांडव उभारण्यात आल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय होत आहे.

सदाशिव पेठेतील नागनाथ पार मंडळ, शताब्दी वर्ष साजरा करणारे निंबाळकर तालीम मंडळ, छत्रपती राजाराम मंडळ यांनी दुमजली मांडव टाकले आहेत. दुमजली मांडवांनी संपूर्ण रस्ता व्यापला आहे. मांडवाखालून एक छोटा रस्ता वाहनांसाठी ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारच्या मांडवांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

मध्यभागातील अरूंद रस्ते आणखी अरूंद झाले असून गेल्या आठवडाभरापासून दररोज सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यांवर मोठी कोंडी होत आहे. गुरुवार पेठेतील कस्तुरे चौक मंडळाच्या मांडवानेही रस्ता व्यापला आहे. व्यापारी पेठेचा हा भाग असल्याने कस्तुरे चौक ते जैन मंदिर चौक तसेच गोविंद हलवाई चौक ते कस्तुरे चौक दरम्यानची वाहतूक विस्कळीत होत आहे.

रविवार पेठेतील तंबाखू आळी व्यापारी मंडळाने दुमजली मांडव टाकला असून हा भाग बोहरी आळी परिसरात असल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत होत आहे.

उत्सवी कोंडी सुरू

मध्य भागातील बाजीराव रस्ता, महात्मा फुले मंडई, रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरात गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी सुरू झाली आहे. शहर आणि उपनगर परिसरातील नागरिकांची शनिवारी आणि रविवारी या भागात खरेदीसाठी मोठी गर्दी होते. रस्ते व्यापणारे मांडव तसेच मोठय़ा संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने येत्या काही दिवसांत मध्य भागात उत्सवी कोंडी सुरू होणार आहे.

पदपथांवर मांडव

अनेक मंडळांकडून पदपथांच्या लगत रनिंग मांडव टाकण्याचे काम सुरू केले आहे. अशा पद्धतीच्या रनिंग मांडवांवर जाहिराती लावण्यात येतात. जाहिरातीच्या माध्यमातून मंडळांना मोठे उत्पन्न मिळते. बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक, मंडई, शनिपार तसेच अन्य परिसरात अशा प्रकारचे मांडव टाकण्यात आले असून पदपथांवर टाकण्यात आलेल्या मांडवांमुळे पादचाऱ्यांची विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे.