अभ्यासाचे नियोजन केल्यावरही स्वत:मध्ये सुधारणा करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दर महिन्याला स्वचाचणी करून त्यानुसार नियोजन बदलले पाहिजे. परीक्षेचे विश्लेषण करून काय विचारले जाते, किती गुण मिळतील, याचा आढावा घ्यायला हवा, असा मंत्र भारतीय नागरी सेवा परीक्षेत (आयएएस) पहिल्याच प्रयत्नात देशात बाविसावा क्रमांक मिळवलेल्या मंदार पत्की यांनी स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांना दिला.

‘लोकसत्ता’तर्फे  आयोजित ‘स्पर्धा परीक्षा गुरू’ या वेब संवादात बोलताना मंदार पत्की म्हणाले की ‘यूपीएससी’ची तयारी करताना मानसिक कणखरता, चांगले आरोग्य, कष्ट करण्याची तयारी, सातत्य, समज आणि आत्मविश्वास हे गुण महत्त्वाचे आहेत. शिवाय, आपल्यामध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण करायला हवी. परीक्षेच्या तयारीसाठी ती आवश्यक आहे आणि दैनंदिन आयुष्यातही ती उपयोगी पडते, असे मंदार यांनी नमूद केले.

‘लोकसत्ता’चे सौरभ कुलश्रेष्ठ आणि स्वाती केतकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास, त्यासाठी करावी लागणारी मेहनत, नियोजन, मुलाखतीची तयारी याबाबत मंदार यांनी मार्गदर्शन केले.

मंदार म्हणाले की यूपीएससी परीक्षेची तयारी मी आठवीपासून सुरू के ली होती. पण मेकॅ निकल अभियांत्रिकी पदवीही पूर्ण के ली. ‘यूपीएससी’मध्ये यश न मिळाल्यास नोकरी करायची हे ठरवून स्वत:साठी तीन वर्षे दिली होती. ‘यूपीएससी’ची तयारी करताना अपार कष्ट करावे लागतात, मानसिक कणखरता असावी लागते. ही परीक्षा करीअरचे ध्येय असली, तरी तिला आयुष्याचे ध्येय करू नका. परीक्षा आहे, परीक्षेसारखेच त्याकडे पहा, असा सल्लाही मंदार यांनी दिला.

‘‘वडील शासकीय सेवेत असल्याने तिकडे आधीपासूनच ओढा होता. त्यामुळे सनदी अधिकारी होण्याची भावना पूर्वीपासूनच मनात निर्माण झाली होती. माझ्या निर्णयाला आई-वडिलांनी नेहमीच पाठिंबा दिला. मला जे करायचे होते, ते करू दिले. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना यशाची खात्री देता येत नाही. त्यामुळे आपल्याकडे पर्याय असायला हवा. त्या दृष्टीने मी अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली. आपल्या सुरक्षिततेचा पूर्ण विचार के ला पाहिजे’’, असे मंदार यांनी नमूद केले.

मंदार म्हणाले, ‘‘स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या काळात अनेक मोह होतात, आर्थिक, भावनिक, शारीरिक, मानसिक ताण येतात. माझ्यावरही ते आले होते. वडील शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर घरच्या आर्थिक बाजूचे काय करायचे, असा माझ्यापुढे प्रश्न होता. पण ‘तीन वर्षे घे आणि अभ्यास कर’ असे वडिलांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे स्वत:च स्वत:चा पालक होऊन अभ्यास करत राहिलो. डॉ. विवेक कुलकर्णी आणि सविता कुलकर्णी यांचे मार्गदर्शन घेतले. मानसिकदृष्टय़ा कणखर झालो, यशासाठी निर्धार केला.’’

आई-वडिलांचे नाव मोठे करायचे होते, त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायचे होते. तसेच आपण समाजाला देणे लागतो ही भावनाही होती. माझ्या वडिलांचे एक वाक्य कायम माझ्यासाठी प्रेरणादायी होते. ते म्हणाले होते-आज लोक तुझ्याकडे जयंत पत्की यांचा मुलगा म्हणून पाहतात, पण असे काम कर की मला मंदारचे वडील म्हणून ओळखले जाईल. त्या वाक्याने मला कायम प्रेरणा दिली’’, अशी भावनाही मंदार यांनी व्यक्त केली.

मुलाखत पुढे ढकलली गेली तेव्हा..

करोना संकटामुळे मार्चमधील मुलाखत पुढे ढकलली गेली तेव्हा महिनाभर काय करायचे हे कळत नव्हते. पण मानसिक ताण येऊ न देण्यासाठी अति तयारी करणे टाळले. थोडा अभ्यास करत ऑनलाइन चाचणी मुलाखत देत होतो, असे मंदार म्हणाले.

तयारी कशी करायची?

‘एनसीईआरटी’च्या अभ्यासक्रमानुसार तयारी के ल्यास संकल्पना अधिक स्पष्ट होतात. इंटरनेटमुळे संधी मिळण्यात समानता येत असली, तरी संधी निर्माण कशा करायच्या हे अनेकांना कळत नाही. इंटरनेटवर माहितीचा प्रचंड साठा आहे, पण प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या असतात. आपल्या क्षमतेनुसार नियोजन के ले पाहिजे. दिवसभरात, महिन्याभरात आपण किती वाचू शकतो हे जाणावे, वाचलेले किती समजून घेऊ शकतो हे समजून घ्यावे. महिन्याचा आणि प्रत्येक दिवसाचा आराखडा ठरवावा. तो पाळण्यात स्पष्टता हवी. आपल्याला जमणार नाही, आता सोडून द्यावे असे प्रत्येकाला वाटते, ते व्हायलाच हवे. कारण यूपीएससी ही मोठी प्रक्रिया आहे. त्यामुळे अभ्यासात सातत्य राखणे आवश्यक आहे. अभ्यास करावासा वाटला नाही, तर दोन दिवस अन्य काही करावे. मात्र पुन्हा अभ्यासाकडे वळताना तो पूर्वीच्याच तडफेने करायला हवा, असे मंदार यांनी स्पष्ट केले.

वर्तमानपत्रांचे वाचन महत्त्वाचे!

अभ्यास करताना वर्तमानपत्राचा उपयोग करत होतो. त्यात इंडियन एक्स्प्रेसमधील लेख, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या लेखांतून आंतरराष्ट्रीय विषय कळण्यास मदत होत होती. त्या लेखांच्या नोंदी ठेवून टिपणे काढत होतो. त्याचा मला फायदा झाला, असेही मंदार यांनी नमूद केले. वर्तमानपत्र अभ्यासासाठी वाचताना त्याला अभ्यासक्रमाशी जोडले पाहिजे. धार्मिक, राजकीय बातम्या टाळणे आवश्यक आहे. सरकारची धोरणे, नवीन प्रकल्प, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बातम्या वाचायला हव्यात, असे मंदार यांनी सांगितले.

समाजमाध्यमे वापरताना..

समाजमाध्यमांचा वापर करताना त्याच्या फायद्या-तोटय़ाचा विचार करायला हवा. फे सबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर वापरू नका. टेलिग्रामवरील काही वाहिन्यांवर चांगले संदर्भ साहित्य मिळते. तर गुगलचा उपयोग माहिती मिळवण्यासाठी करा, असे आवाहन मंदार यांनी केले.

सर्वसाधारण विद्यार्थ्यांनाही शक्य!

आपण कोणत्या शाखेची पदवी घेतली आहे, किती गुण मिळाले आहेत, याचा स्पर्धा परीक्षेशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे सर्वसाधारण विद्यार्थ्यांलाही ‘यूपीएससी’ची तयारी करणे शक्य आहे. कारण आपले व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास, कष्ट करण्याची तयारी, दूरदृष्टी असायला हवी. मेहनत करता येत नसेल, तर आपल्या क्षमतांचा विचार करायला हवा. ‘यूपीएससी’ला मराठी माध्यम घेऊन काहीच तोटा होत नाही. आपल्याकडे असलेल्या अभ्यासासाठीच्या स्रोतांचा आपण कसा वापर करतो, ते महत्त्वाचे आहे. मी मेकॅ निकल अभियंता असूनही मला त्या विषयातील चार प्रश्न सोडवता आले नाहीत, असे मंदार यांनी स्पष्ट केले.

कार्यक्षम अधिकारी व्हायचे आहे!

‘यूपीएससी’त मिळालेल्या यशामुळे मेहनतीचे चीज झाले. आई-वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी के ल्याचे समाधान वाटले, अशी भावना मंदार यांनी व्यक्त के ली. त्याचवेळी आता जबाबदारीची आणि समाजासाठी काय काम करायचे आहे, याची जाणीव झाली आहे. नागरिकांच्या अपेक्षापूर्तीसाठी नियोजन करावे लागणार आहे. कार्यक्षम अधिकारी म्हणून नाव व्हावे, अशी इच्छा आहे. त्यासाठी प्रयत्न करणार आहे. भारत हाच माझा केडर असेल, असेही मंदार यांनी नमूद केले.

मानसिक कणखरतेची कसोटी!

मंदार म्हणाले, ‘‘यूपीएससीची तयारी आपली मानसिक कणखरता तपासत असते. प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. विश्लेषण करताना विषयानुसार किती प्रश्न विचारले गेले आहेत हे तपासायला हवे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवडीच्या विषयाचा अभ्यास करताना अभ्यास करायचा की मनोरंजन हे ठरवले पाहिजे. कारण आपल्या आवडीचा प्रश्न विचारला जाईल याची खात्री नसते. ‘यूपीएससी’मध्ये अनिश्चितता हा मोठा घटक आहे. काही वेगळे विचारले जाऊ शकते, त्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे. अभ्यासासाठी नोंदी ठेवताना त्या ऑनलाइन काढल्यास त्यांत हव्या त्या वेळी बदल करता येतो. लिहून ठेवायच्या असतील, तर त्यात जरा जास्त जागा ठेवावी लागते, हे लक्षात घेतले पाहिजे.’’