खासगी रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

पुणे : धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंद असलेल्या खासगी रुग्णालयांनी शासकीय योजनांचे लाभ रुग्णांना देणे बंधनकारक आहे. हे लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरिबांना मोफत, मध्यवर्गीयांना अल्पदरात उपचार मिळतात. मात्र, शहरातील काही रुग्णालयांकडून या सुविधा देण्यासाठी टाळाटाळ  करण्यात येते. याबाबत दर आठवडय़ाला होणाऱ्या करोना सद्य:स्थिती आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी तक्रारी के ल्या होत्या. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धर्मादायकडे नोंद असलेल्या रुग्णालयांची बैठक घेण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांना के ली होती. त्यानुसार डॉ. देशमुख यांनी धर्मादायकडे नोंद असलेल्या खासगी रुग्णालयांची बैठक घेऊन हा इशारा दिला.

धर्मादायकडून सवलती मिळणाऱ्या रुग्णालयांनी गरिबांना मोफत, तर मध्यमवर्गीयांना माफक दरात सुविधा देणे आवश्यक आहे. अशाप्रकारे सुविधा न देणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येईल. सरकारी सवलती घेणाऱ्या रुग्णालयांनी सेवा पुरवणे बंधनकारक आहे. करोना काळासाठी शासनाने ठरवून दिलेली नियमावली सर्व रुग्णालयांनी पाळणे आवश्यक आहे.

या रुग्णालयांचे लेखापरीक्षण वेळेवर होणे आवश्यक आहे. अनेक रुग्णालयांचे लेखापरीक्षण होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या रुग्णालयांवर तातडीने समिती नियुक्त करून तक्रारींचा निपटारा के ला जाईल. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित जिल्ह्य़ात धर्मादायकडे नोंद असलेली ५५ पेक्षा जास्त रुग्णालये आहेत. संबंधित रुग्णालयांनी गरीब, मध्यमवर्गीयांना देण्यात येणाऱ्या सेवेची माहिती देणारे फलक रुग्णालयात दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी या वेळी सांगितले.

शहरातील धर्मादायकडून सवलती घेणाऱ्या रुग्णालयांना अचानक भेट दिली जाणार आहे. सुविधा देणे ही रुग्णालयांची जबाबदारी आहे. प्रत्येक रुग्णालयाने माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. तसेच शल्यचिकित्सकांचा चमू नेमून रुग्णालयांबाबत येणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्याचा प्रयत्न आहे.

– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी