पुणे : करोना प्रादुर्भावाचा फटका आता श्रावणातील मंगळागौरीच्या सणाला बसला आहे. गर्दी टाळण्याच्या उद्देशातून ३१ जुलैपर्यंत टाळेबंदी असल्यामुळे पहिल्या दोन मंगळवारी नवविवाहितेला घरीच मंगळागौरीचे पूजन करावे लागणार आहे.

श्रावण महिन्यापासून व्रतवैकल्ये सुरू होतात. यंदा मंगळवारपासूनच (२१ जुलै) श्रावणाला सुरुवात होत असली, तरी नवविवाहितेला मंगळागौरीचा सण सार्वजनिक रीत्या साजरा करता येणार नाही. करोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि गर्दी टाळण्याच्या उद्देशातून ३१ जुलैपर्यंत माणसांनी एकत्र जमण्यास मनाई आहे. त्याचा फटका मंगळागौरीच्या सणाला बसला आहे. पन्नास जणांच्या उपस्थितीत विवाह करण्यास परवानगी असली, तरी त्यामध्ये मंगळागौरीचा समावेश नाही. १४ जुलै रोजी शेवटचा विवाह मुहूर्त असला, तरी टाळेबंदीमुळे त्या दिवशी विवाह होऊ शकले नाहीत. त्याचप्रमाणे शहरातील मंगल कार्यालये ३१ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे पहिल्या दोन मंगळवारी तरी मंगळागौरीचा सण होऊ शकणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी दिली.

पूर्वी कार्यालय घेऊन मंगळागौर साजरी केली जात होती. मात्र, आता त्यामध्ये बदल झाला आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना जागरण करणे शक्य नसल्याने सोसायटीच्या सभागृहामध्येच मंगळागौर पूजन केले जाते. मंगळागौरीला मोजकीच माणसे असल्यामुळे भोजनाची ऑर्डर देखील ५० ते ७० जणांची असते. हा बदल ध्यानात घेऊन शहरातील कार्यालयांनी केवळ भोजनाच्या ऑर्डरमध्येच मंगळागौरीसाठी जागेचे भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे, याकडे सरपोतदार यांनी लक्ष वेधले.

घरीच पूजन करावे

करोना संकटामुळे या वर्षी कार्यालय घेऊन मंगळागौर पूजन सोहळा करता येणार नाही. तरी नवविवाहितेने घरीच साधेपणाने मंगळागौर पूजन आणि कथा वाचन करावे, असे ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी सांगितले. पूर्वी मंगळागौर घरीच साजरी होत असे. पण, हौसेला मोल नाही असे म्हणतात. त्यामुळे नंतरच्या काळात कार्यालय घेऊन मंगळागौरीचा सण करण्याची पद्धत सुरू झाली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

केवळ दोनच मंगळवार

यंदा श्रावण मंगळवारपासून (२१ जुलै) सुरू होत आहे. त्यानंतरचा मंगळवार २८ जुलै रोजी येत आहे. करोना संकटामुळे सुरू असलेल्या टाळेबंदीचा कालावधी ३१ जुलैपर्यंत असल्यामुळे पहिले दोन मंगळवार घरीच पूजन करावे लागणार आहे. त्यानंतरच्या दोन मंगळवारी (४ ऑगस्ट आणि ११ ऑगस्ट) कार्यालय घेऊन सार्वजनिक रीत्या मंगळागौर पूजन करता येईल की नाही हे सांगता येत नाही. तर, अखेरच्या मंगळवारी १८ ऑगस्ट रोजी अमावस्या आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक पद्धतीने मंगळागौर पूजन करण्यासाठी केवळ दोनच मंगळवार मिळत आहेत.