पुणेकरांना वाहतुकीची शिस्त लागावी म्हणून विविध यंत्रणांकडून नाना प्रयत्न केले जात आहेत. त्याला 14Cartoon1नागरिकांकडूनही वेगवेगळ्या प्रकारे साथ मिळते. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी दीपावलीच्या निमित्ताने याच कारणासाठी व्यंगचित्रांचा संच तयार केला असून, त्याद्वारे लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचे नाव आहे- ‘अपघातमुक्त पुण्याकडे.. आपल्या मदतीने!’
वाहतुकीचे नियम पाळण्याच्या बाबतीत पुणेकरांची ख्याती चांगली नाही. ‘लोकसत्ता’तर्फे दोन महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. शहरातील काही सिग्नल निवडून किती वाहनचालक सिग्नल पाळतात हे पाहण्यात आले. त्यात एकतृतीयांशपेक्षा जास्त वाहनचालक सिग्नल तोडून जात असल्याचे पाहायला मिळाले. याबाबत नागरिकांकडून प्रतिक्रिया मागविण्यात आल्या होत्या. त्यात बेशिस्त वाहनचालकांची टक्केवारी कितीतरी जास्त असल्याचे मत अनेक नागरिकांनी नोंदवले होते. अशा पुणेकरांमध्ये वाहतुकीची शिस्त यावी म्हणून तेंडूलकर यांनी ही व्यंगचित्रं तयार केली आहेत. त्यात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविल्यामुळे घडणाऱ्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
14Cartoon2
‘‘महापालिका आणि पोलीस ही मंडळी त्यांच्या सेवांना बांधलेली आहेत. ती त्यांच्या पलीकडे जात नाहीत. या लोकांकडून प्रयत्न केले जात असले, तरी प्रत्यक्षात पुण्यातील अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातून मी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी व्यंगचित्र हे शक्तिशाली माध्यम आहे. त्याद्वारे मांडलेली कल्पना बराच काळ लोकांच्या डोक्यात राहते. त्यामुळे त्याचा उपयोग करून ही समस्या थोडीशी हलकी व्हावी, यासाठी हा प्रयत्न केला आहे.’’
– मंगेश तेंडुलकर, ज्येष्ठ व्यंगचित्रकार