प्रतिकूल वातावरणाचा आंबा उत्पादनावर परिणाम

पुणे : यंदा प्रतिकूल हवामानामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा येथील घाऊक बाजारात आंब्याची आवक कमी होत आहे. कोकण भागातून येत्या काही दिवसांत हापूसची आवक वाढण्याची शक्यता घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

कोकण भागात मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस, ओखी वादळाचा फटका आंबा उत्पादनावर झाला आहे. थंडीत रात्रीचे तापमान कमी असायचे, मात्र दिवसा तापमान चढे असल्याने त्याचा परिणाम आंब्यावर झाला. आंब्याचा पहिला मोहोर गळाला. जवळपास पहिल्या टप्प्यात रत्नागिरी हापूसचे उत्पादन यंदा तीस ते पस्तीस टक्के राहिले. आठ वर्षांपूर्वी आंबा उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यानंतर यंदाच्या हंगामात आंबा उत्पादनावर परिणाम झाल्याचे मार्केट यार्डातील फळबाजारातील व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात रत्नागिरी हापूसच्या दररोज पंचवीस ते तीस हजार पेटय़ांची आवक कोकणातून व्हायची. यंदा ही आवक पाच ते सहा हजार पेटय़ांवर आहे. गेल्या वर्षीची आवक पाहता आंब्याची आवक कमी आहे. प्रतिकूल वातावरणाचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. त्या तुलनेत कर्नाटक हापूसची आवक बरी आहे. कर्नाटक हापूसची पंचवीस ते तीस हजार खोकी दररोज विक्रीसाठी दाखल होत आहेत. हंगामातील दुसऱ्या टप्प्यात आंब्याची बऱ्यापैकी आवक होण्याची शक्यता आहे, असे मोरे यांनी सांगितले.

घाऊक बाजारातील हापूसचे दर

* रत्नागिरी हापूस (कच्चा, चार ते आठ डझन पेटी)- एक हजार ते पंचवीसशे रुपये

* रत्नागिरी हापूस (तयार, चार ते आठ डझन पेटी)- पंधराशे ते पस्तीसशे रुपये

कर्नाटकातून २० हजार आंब्याच्या पेटय़ा

कर्नाटक आंब्याच्या वीस ते बावीस हजार पेटय़ा विक्रीसाठी शुक्रवारी दाखल झाल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर्नाटक आंब्याची आवक तशी कमी आहे. मागील वर्षी मे महिन्यात कर्नाटक आंब्याच्या पेटय़ांची आवक चाळीस हजारापर्यंत गेली होती.  कर्नाटक आंबा (कच्चा) चार डझनाच्या पेटीचा दर आठशे ते बाराशे रुपये राहिला. पायरीच्या चार ते पाच डझन पेटीचा दर सहाशे ते आठशे रुपये राहिला असल्याची माहिती आंबा व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली.