पेटीमागे दरात ५०० रुपयांची वाढ; गेल्यावर्षीच्या तुलनेत आवक कमी

साडेतीन मुहूर्तापैकी असलेल्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर फळबाजारात कोकण भागातून मोठय़ा प्रमाणावर आंबा विक्रीसाठी पाठविला जातो. गेल्या महिन्याभरापासून हापूसची तुरळक आवक बाजारात सुरू होती. यंदा प्रतिकूल वातावरण आणि आंब्यावर पडलेल्या थ्रिप्स रोगामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आंब्यांची आवक कमी झाली आहे. पेटीमागे ५०० रुपयांनी आंबा महागला आहे.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील फळबाजारात दररोज हापूस आंब्यांच्या दीड हजार पेटय़ांची आवक होत आहे. कर्नाटक भागातील हापूसचीही आवक सुरू आहे. सध्या कर्नाटक हापूसची आवक दोन हजार पेटय़ांच्या आसपास आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आंब्यांचे दर चढे आहेत. त्यामुळे पाडव्याला आंब्यांचे दर तेजीत राहिले आहे. चार ते आठ डझनाच्या कच्च्या आंब्यांच्या पेटीला १५०० ते ३५०० रुपये असा भाव घाऊक बाजारात मिळाला. तर तयार हापूसला चार ते आठ डझनाच्या पेटीला १८०० ते ४००० रुपये भाव मिळाला. तयार हापूसच्या पाच ते दहा डझनाच्या पेटीला २५०० ते ५००० रुपये असा भाव मिळाला आहे. किरकोळ बाजारात एक डझन हापूसची ५०० ते ८०० रुपये दराने विक्री केली जात आहे.

यंदा वातावरणातील  बदलांचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. आंब्यांवर थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. निवडणुका, परीक्षा तसेच उन्हाळ्यामुळे आंब्यांच्या विक्रीवर सध्या परिणाम जाणवत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाडव्याला आंब्याचे दर तेजीत आहेत.

– अरविंद मोरे, आंबा व्यापारी, मार्केटयार्ड

कर्नाटक हापूसची आवक गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. गेल्या वर्षी पाडव्याला आवक चांगली होती. यंदा कर्नाटकातील आंब्यांची आवक जवळपास  ५० टक्क्यांनी  कमी झाली असून दरात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पाडव्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी कर्नाटकातील आंब्यांची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर कर्नाटक हापूसचे दर उतरतील. सध्या कर्नाटक हापूसच्या ४ ते ५ डझनाच्या पेटीचा दर १५०० ते २००० रुपये आहे. कर्नाटक हापूसचा प्रतिडझनाचा दर ४०० ते ५०० रुपये आहे.

– रोहन उरसळ, आंबा व्यापारी, सचिव, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते संघटना