चार ते पाच डझन फळांच्या पेटीची किंमत ८०० ते १६०० रुपये

कोकणातील आंब्यांची देशभरात आतुरतेने प्रतीक्षा होत असताना कर्नाटकचे आंबे मात्र राज्यात मोठय़ा प्रमाणात भाव खाऊन जात आहेत. मुंबई, पुण्यासह राज्यातील मोठय़ा  फळबाजारांमध्ये कर्नाटकातील आंब्यांची आवक वाढली आहे.

राज्यात कर्नाटकचे आंबे मोठय़ा प्रमाणात दाखल होत असून पुण्यातील मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी कर्नाटक आंब्याच्या १५ हजार पेटय़ा तसेच ३० हजार केट्र्स (प्लास्टिक जाळी) अशी आवक झाली. यंदा वातावरणातील बदलांमुळे कर्नाटक आंब्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.  यंदा फेब्रुवारी महिन्यात कर्नाटकातील आंब्यांची आवक सुरू झाली. अवकाळी पावसामुळे कर्नाटकातील आंब्यांच्या प्रतवारीवर काहीसा परिणाम झाला आहे. आंब्यांचा आकार लहान आणि मध्यम आहे. कर्नाटकातील तुमकुर भागात आंब्यांची मोठी लागवड केली जाते. यंदाच्या वर्षी वातावरणातील बदलांचा परिणाम आंबा उत्पादनावर झाल्याची माहिती दिली, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारातील आंबा व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली.

कर्नाटकातील आंब्यांचे दर

  • कर्नाटक हापूस (४ ते ५ डझन पेटी)- ८०० ते १६०० रुपये,
  • पायरी (४ डझन पेटी) ५०० ते ८००,
  • लालबाग- २५ ते ४५ रुपये किलो,
  • बदाम/ बैंगनपल्ली- ३० ते ४० रुपये किलो