News Flash

अक्षय्य तृतीयेसाठी आंबा बाजार बहरला!

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील आंबा बाजारात रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग परिसरातून हापूस आंब्यांची आवक होत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रतवारीनुसार ३०० ते ७०० रुपये डझन

पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला आंबा पूजन करून पूर्वजांना नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. अक्षय्य तृतीयेसाठी बाजारात मोठ्या प्रमाणावर हापूस आंब्यांची आवक सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक डझन हापूस आंब्यांची विक्री ३०० ते ७०० रुपये दराने केली जात आहे. यामध्ये कर्नाटक आणि रत्नागिरी हापूसचा समावेश आहे.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील आंबा बाजारात रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग परिसरातून हापूस आंब्यांची आवक होत आहे. फळबाजारात मंगळवारी (११ मे) तीन ते साडेतीन हजार हापूस आंब्यांच्या पेट्यांची आवक झाली. कच्च्या हापूसच्या चार ते सहा डझनाच्या पेटीला प्रतवारीनुसार एक ते अडीच हजार रुपये तसेच पाच ते दहा डझनाच्या पेटीला दीड हजार ते चार हजार रुपये असा भाव मिळाला आहे. प्रतवारीनुसार चार ते सहा डझनाच्या तयार हापूसच्या पेटीची दीड ते तीन हजार रुपये आणि पाच ते दहा डझनाच्या तयार हापूसच्या पेटीची दोन ते पाच हजार हजार रुपये दराने विक्री करण्यात आली.

मार्केट यार्डसह महात्मा फुले मंडईतील बाजारात आंबा खरेदीसाठी गेल्या दोन दिवसांपासून गर्दी होत आहे. किरकोळ आंबा विक्रेत्यांनी शनिपार, मंडई परिसरात तात्पुरती दुकाने थाटली आहेत. निर्बंधामुळे आंबा खरेदीवर काहीसा परिणाम झाला असल्याची माहिती किरकोळ बाजारातील विक्रेत्यांनी दिली.

कर्नाटक हापूसची आवक वाढली

करोनाचा संसर्गामुळे निर्बंध आहेत. त्यामुळे बाजारात मंदीचे वातावरण आहे. कर्नाटकातून आंब्यांच्या वीस ते पंचवीस हजार पेट्यांची आवक झाली. ग्रामीण भागातून खरेदीदारांची फारशी गर्दी होत नाही. गेल्या वर्षी टाळेबंदी होती. त्या तुलनेत यंदाच्या वर्षी परिस्थिती चांगली आहे. कर्नाटक हापूसच्या चार डझनाच्या पेटीचे दर ५०० ते ८०० रुपये आहेत. तयार आंब्यांच्या पेटीचे दर ८०० ते १५०० रुपये आहेत, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटनेचे सचिव आणि कर्नाटक आंबा व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.

सध्या बाजारात दर्जेदार हापूसची आवक होत आहे. सध्याच्या वातावरणात आंबा लवकर पक्व होत असून गोडीही चांगली आहे. अक्षय्य तृतीयेला आंब्यांना चांगली मागणी असते. मात्र, निर्बंधामुळे मागणी काहीशी कमी झाली आहे. आवक जास्त झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा हापूसचे दर कमी झाले आहेत.

– अरविंद मोरे, आंबा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 12:02 am

Web Title: mango market sale of hapus mangoes akp 94
Next Stories
1 पुणे : “रमजान ईद घरीच साजरी करा”; मनपा आयुक्तांचे आवाहन!
2 पुण्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा सर्रासपणे गैरवापर! ६३९ कोविड रुग्णालयांच्या ऑडिटचे निष्कर्ष!
3 थरारक! राष्ट्रवादीचे आमदार बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार; थोडक्यात बचावले
Just Now!
X