एखाद्याने मौज म्हणून केलेली गोष्ट दुसऱ्यासाठी त्रासदायक ठरू शकते याचा प्रत्यय पुन्हा एकदा पुण्यातील एका घटनेने अधोरेखित केला. येथील येरवाडा जवळील डेक्कन कॉलेज रस्त्यावर पडलेला पतंगाचा मांजा लागल्याने एक युवक गंभीर जखमी झाला आहे. थोडक्यात या युवकाचे नाव वाचले असले तरी मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

कामगार नगर येथे राहणारा २८ वर्षीय संतोष कांबळे काल सायंकाळी दुचाकीवरून घरी जात असताना डेक्कन कॉलेज रस्त्यावर पडलेला पतंगाचा मांजा त्याला दिसला नाही. गाडीवर असल्याने मांजा त्याच्या नाकावरून गालाजवळून घासून गेला. त्यामुळे त्याच्या नाकाला आणि गालाला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने मांजा लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने त्यांने वेळीच गाडी थांबवली आणि तो मांजा गळ्याला लागला नाही.

या घटनेनंतर लगेचच जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ उपचार करुन काही तास देखरेखी खाली ठेवल्यानंतर रात्री उशीरा घरी पाठवले.

मागील आठवड्यात घडलेल्या दोन घटना

या आधीही मागील आठवड्यात हमजा खान अवघ्या तीन वर्ष्याच्या चिमुकला माजांमुळे गंभीर जखमी झाला होता,तर रंगनाथ भुजबळ या जेष्ठ नागरिकाचा गळा कापला होता. त्यामुळे संतोषबरोबर घडलेल्या घटनेमुळे मांजा किती घातक असू शकतो याच पुन्हा एक उदाहरण समोर आलं आहे.

कबुतराचा जीव गेला

केशव नगर येथील मोरया गोसावी मैदानाजवळ लटकत्या मांज्यामुळे कबुतराच्या जीव गेला आहे. काल संक्रांत असल्याने काही हौशी नागरिकांनी पतंग उडवल्यानंतर अनेक ठिकाणी मांजा वायरींना आणि झाडांना लटकलेल्या अवस्थेत तसेच आहेत. मात्र याच लटकलेल्या मांजात एक कबुतर अडकले. मांजा न दिसल्याने थेट गळ्याजवळच हे कबूतर मांजाला अडकल्याने त्याला गळफास बसला आहे. या अपघातात कबुतराच्या तडफडून मृत्यू झाला आहे.ही घटना आज सकाळी घडल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. जमिनीपासून ४० ते ४५ फूट वर पतंगाच्या मांज्यात कबुतर लटकत असल्याची वर्दी अग्निशमन दलाच्या जवानांना सकाळी साडेदहा वाजता आली.तातडीने घटनास्थळी जवान गेले परंतु तोपर्यंत कबुतराच्या मृत्यू झाला होता.