निवेदिका मंजिरी धामणकर यांची भावना

घरातील कलासक्त वातावरण आणि उत्तम संस्कार यामुळे जेथून चांगले मिळते ते घ्यायचे, अशा मधुकर वृत्तीतूनच निवेदनाच्या प्रांतामध्ये माझी जडणघडण झाली, अशी भावना प्रसिद्ध निवेदिका आणि एकपात्री कलाकार मंजिरी धामणकर यांनी रविवारी व्यक्त केली. श्रोत्यांची अभिरुची उंचावणे हे कलाकाराचे कर्तव्य असते, असेही त्यांनी सांगितले.

निवेदनाची पंचवीस वर्षे पूर्ण केल्याबद्दल आडकर फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात धामणकर यांचा ज्येष्ठ गायिका डॉ. अलका देव-मारुलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर आणि प्रमोद आडकर या वेळी व्यासपीठावर होते. उत्तरार्धात रवींद्र खरे यांनी मुलाखतीतून निवेदिका, मुलाखतकार, अभिनेत्री, बंगाली आणि उर्दू साहित्याच्या अनुवादिका असे मंजिरी धामणकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले.

अलकाताई यांच्याकडे गाणं शिकताना कधी तरी त्यांच्यामागे तंबोरा घेऊन बसण्याची इच्छा होती. ते शक्य होऊ शकले नसले तरी निवेदिका म्हणून त्यांच्याशेजारी बसण्याची संधी मिळाली, असे सांगून धामणकर म्हणाल्या, निवेदन करताना निव्वळ विनोदनिर्मिती करायची नाही हे पथ्य जाणीवपूर्वक पाळले. निवेदकाने विदूषकाप्रमाणे हसविणे ही अपेक्षा मान्य होणारी नाही.

एका कामातून दुसरे काम मिळत गेले. कोणाचेही पाठबळ नसताना अनेकांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्यातून ही वाटचाल झाली. मला घडविणाऱ्या सर्वाविषयी अपार कृतज्ञता आहे.

सूर चांगला असला, तरी मंजिरी गायनाच्या प्रांतामध्ये फार पुढे जाईल असे वाटले नाही. त्यामुळेच तंबोरा सोडून तू निवेदनाच्या क्षेत्रामध्ये जावेस असे मी तिला सुचविले. स्वरलगाव हा गायक सुरांतून तर, निवेदक शब्दांतून मांडतो, असे अलका देव-मारुलकर यांनी सांगितले. अन्य शिष्य आणि माझ्यामध्ये अंतर आहे. मात्र, आत्मसात केलेल्या विविध भाषांमुळे मंजिरी केवळ शिष्या न राहता माझी मैत्रीण झाली, असेही त्या म्हणाल्या. उदय टिकेकर यांनी धामणकर यांना शुभेच्छा दिल्या. आडकर यांनी प्रास्ताविक केले. अदिती अत्रे यांनी सूत्रसंचालन केले.