अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

‘आयटी पार्क’ म्हणून जगाच्या नकाशावर झळकणाऱ्या िहजवडीच्या वेशीला लागून असणाऱ्या माण गावच्या सरपंच स्मिता सागर भोसले यांच्या घरात शौचालय नसल्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली असता त्यांनी ही कारवाई केली. त्याचप्रमाणे, कार्यवाही पुस्तिकेत खाडाखोड केल्याप्रकरणी माणच्या ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विकासाचे परिपूर्ण मॉडेल म्हणून माण ग्रामपंचायतीची ओळख सांगितली जाते. याच माणच्या सरपंच स्मिता भोसले यांना घरात शौचालय नसल्याच्या कारणावरून अपात्र ठरवण्यात आले आहे. गेल्या ऑगस्टमध्ये माणची ग्रामपंचायत निवडणूक झाली, तेव्हा भोसले यांनी घरात शौचालय असल्याचा दाखला निवडणूक आयोगाकडे दिलेल्या अर्जासोबत जोडला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्या निवडून आल्या. पुढे, सरपंचपदावर त्यांची निवड झाली. मात्र, सरपंच पदावर बसल्यानंतर घराजवळ शौचालय बांधत असल्याचे सांगत ग्रामपंचायतीत तशी नोंद करावी आणि शौचालयासाठी मिळणारे अनुदान द्यावे, याकरिता अर्ज केला. तथापि, त्यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र भोसले यांनी याबाबत तक्रार केल्याने सरपंच भोसले यांच्या घरात शौचालय नसल्याचा प्रकार उघड झाला. या तक्रारीमुळे सरपंचांच्या पतीने ग्रामसेवकाच्या मदतीने ग्रामपंचायतीच्या कार्यवाही पुस्तिकेत खाडाखोड करण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टी अपर जिल्हाधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीत उघड झाल्याने त्यांनी सरपंचांना अपात्र ठरवण्याची कारवाई केली. तथापि, विरोधकांनी खोटे आरोप केल्याचे सांगत या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे स्मिता भोसले यांच्याकडून सांगण्यात आले.