समाजातील विविध प्रश्न, नवे कायदे आणि समस्यांच्या अभ्यासासाठी त्याचप्रमाणे या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विचारमंथन करण्याच्या उद्देशातून अलर्ट या स्वयंसेवी संस्थेने मंथन या अभ्यास गटाची स्थापना केली आहे. राजेंद्रनगर येथील इंद्रधनुष हॉल येथे ३० नोव्हेंबर रोजी या अभ्साय गटाचा पहिला कार्यक्रम होणार आहे.
‘अलर्ट’च्या प्रमुख खासदार वंदना चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तज्ज्ञांची व्याख्याने, गटचर्चा आणि सामाजिक-वैज्ञानिक-विकास प्रकल्पांसबद्दल माहितीपर व्याख्याने असे या अभ्यास गटाचे स्वरूप असून महिन्यातून दोन कार्यक्रम होणार आहेत. दीपक बिडकर आणि संजीवनी जोगळेकर हे या अभ्यास गटाचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
वंदना चव्हाण म्हणाल्या, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि कार्यकर्त्यांना विविध प्रश्न, कायदे आणि समस्यांच्या सोडवणुकीसाठी सुरू असलेले प्रयत्न याची सतत अभ्यासाची आवश्यकता असते. मात्र, त्यासाठी सूत्रबद्ध प्रयत्न करणे आणि वेळ देणे शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन हा अभ्यास गट सुरू करण्यात येत आहे. विविध विषयांतील आणि क्षेत्रातील तज्ज्ञ व्याख्यान देतील आणि गटचर्चेला वेळ देतील. या अभ्यासाचा उपयोग व्यक्ती, संस्था आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात व्हावा आणि एखाद्या प्रश्नाशी जोडून घेण्याची वाट मिळावी असाही अभ्यास गटाचा उद्देश आहे. मूलभूत हक्क, शिक्षण हक्क कायदा, माहिती अधिकार कायदा, कौटुंबिक छळ, भूमी संपादन कायदा, कामाच्या ठिकाणी होणारा छळ, अन्न सुरक्षा कायदा, विकास आराखडा, लोकपाल-जनलोकपाल, घनकचरा व्यवस्थापन, र्सवकष वाहतूक आराखडा, चिरंतन विकास, कौशल्ये प्रशिक्षण असे विविध विषय या अभ्यास गटाच्या माध्यमातून हाताळण्यात येणार आहेत. अभ्यास गटाने सदस्यत्व नि:शुल्क आहे. मात्र, नावनोंदणीसाठी दीपक बिडकर (मो.क्र. ९८५०५८३५१८) यांच्याशी संपर्क साधावा.