कोथरूडमधील मंत्री पार्क (१) हाऊसिंग सोसायटीमधील शंभर सदनिकाधारक त्रस्त झाले असून सोसायटी व्यवस्थापनाच्या गैरकारभारामुळे येथील शेकडो रहिवाशांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. सोसायटी व्यवस्थापन समितीने सभासदांना अंधारात ठेवून बोअरवेलसाठी अनधिकृत वीजजोडणी घेतली होती. त्यावरही ‘महावितरण’ने कारवाई केली आणि वीजचोरीमुळे सोसायटीचा वीजपुरवठा या प्रकरणात तोडण्यात आला.
व्यवस्थापन समितीच्या कारभारामुळे मंत्री पार्क सोसायटीमधील रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सोसायटीत शंभर सदनिकाधारक असून सोसायटी व्यवस्थापन समितीच्या गैरकारभारांमुळे रहिवाशांच्या अडचणी वाढत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. तसे निवेदन रहिवाशांच्या वतीने सहकार खात्याच्या उपनिबंधकांना देण्यात आले आहे.
व्यवस्थापन समितीने गेल्या दहा वर्षांचा हिशेब व लेखा परीक्षण अहवाल न दिल्यामुळे, तसेच नियमानुसार वार्षिक निवडणुका न घेतल्यामुळे सभासदांनी सहकार खात्याकडे तक्रार केली आहे. या सर्व अनियमिततेची दखल घेऊन सहकार खात्याने सोसायटीवर प्रशासकाची नेमणूक करावी, अशीही मागणी खात्याकडे करण्यात आली आहे. सोसायटीतील सभासदांनी सांगितले की, या मागणीमुळे स्वयंघोषित समितीने सोसायटीची वीज देयके भरण्याचे थांबवून सदस्यांना वेठीस धरले आहे. सध्याच्या व्यवस्थापन समितीने सोसायटीच्या सभासदांना अंधारात ठेवून बोअरवेलसाठी अनधिकृत वीज जोडणी घेतली होती. ही अनधिकृत वीज जोडणी उघड झाल्यानंतर ‘महावितरण’ने वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे सोसायटीच्या सभासदांच्या हालअपेष्टांमध्ये भरच पडली. त्यासाठी महावितरणने केलेला ३५ हजार रुपयांचा दंड सभासदांना भरावा लागला.
व्यवस्थापन समिती बेकायदेशीर कृत्य करत असल्याचीही तक्रार सहकार खात्याकडे करण्यात आली आहे. व्यवस्थापन समितीमुळे सभासदांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्यामुळे त्वरित प्रशासक नेमावा, अशीही मागणी खात्याकडे करण्यात आली आहे.