भारतात पहिल्यांदाच कपचे डिझायनिंग

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महिलांना मासिक पाळीच्या काळात वापरता येणाऱ्या कपची निर्मिती एमआयटी एडीटी विद्यापीठातील प्रमोद प्रिया रंजन यांनी के ली आहे. सॅनिटरी पॅडला पर्याय ठरू शकणारा हा कप महिलांसाठी अतिशय उपयुक्त असून, भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचा कप डिझाईन करण्यात आला आहे.

‘ऑनपिरी’ असे नाव असलेल्या या कपचे अनावरण महिला दिनाच्या औचित्याने सोमवारी करण्यात आले. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कु लगुरू डॉ. मंगेश कराड, एमआयटी अटल इन्क्युबेशन सेंटरचे सीईओ डॉ. मोहित दुबे, कपचे निर्माते प्रमोद प्रिया रंजन, एमआयटी इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाईनचे डॉ. नचिकेत ठाकूर आदी या वेळी उपस्थित होते.

कपविषयी प्रमोद प्रिया रंजन यांनी माहिती दिली. ‘आतापर्यंत उपलब्ध असलेले वापरण्यात महिलांना अडचणी येत होत्या. त्यामुळे या समस्येकडे लक्ष देऊन नव्याने कप डिझाईन करण्यात आला. वापरण्यासाठी सोयीस्कर हा घटक लक्षात ठेवूनच त्याचे डिझाईन करण्यात आले. त्यामुळे महिलांना मासिक पाळीच्या काळात हा कप वापरताना कोणताही त्रास होणार नाही. हा कप जवळपास ७५० सॅनिटरी पॅड्सच्या बरोबरीचा आहे. सॅनिटरी पॅड्सचे विघटन ही मोठी समस्या असल्याने हा कप अतिशय महत्त्वाचा आहे,’ असे त्यांनी सांगितले.