24 September 2020

News Flash

रेल्वे बंदमुळे अनेकांच्या नोकऱ्या संकटात

मुंबई-पुणे शहरांचा रोज प्रवास करणारे नोकरदार हवालदिल

(संग्रहित छायाचित्र)

रोजगारासाठी पुणे-मुंबईदरम्यान रोजचा प्रवास करणारा नोकरदार वर्ग हवालदिल झाला आहे. टाळेबंदीमुळे रेल्वे बंद असल्याने पुण्यातून मुंबईत नोकरीवर जाणे शक्य नाही. सुरुवातीच्या काळात घरून काम करण्याची सवलत देणाऱ्या कार्यालयांकडून आता नोकरीवर हजर होण्याच्या सूचना केल्या जात आहेत. त्यामुळे विचित्र कात्रीत सापडलेल्या हजारो व्यक्तींच्या नोकऱ्या संकटात सापडल्या आहेत.

पहिली टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर रेल्वे बंदबरोबरच कार्यालये बंद होती. त्यानंतर महत्त्वाच्या क्षेत्रांतील कामगारांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली होती. या दोन्ही टप्प्यांमध्ये कोणतीही अडचण जाणवली नाही. पण आता बहुतांश कार्यालयांचे कामकाज पूर्ववत करण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांना शासनाने ठरवून दिलेल्या क्षमतेत प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहावे लागत आहे. सर्वच कामगारांना आळीपाळीने कामावर बोलावले जात आहे. पुण्यातून मुंबईत नोकरीसाठी जाणाऱ्या नोकरदारांनाही आता कामावर रुजू होण्याच्या सूचना कार्यालयांनी दिल्या आहेत.

रेल्वे बंद आणि मुंबईतील करोनाचे संकट आणि विलगीकरणाची प्रक्रिया आदी सर्व गोष्टींच्या अडचणी असल्याने नोकरीवर तातडीने हजर होणे शक्य नसल्याचे नोकरदार मंडळींकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आता मुंबईत निवासी राहा, अशाही सूचना काहींना केल्या जात आहेत.

परिस्थिती काय?

पुणे शहरात राहून मुंबईत नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने जाणाऱ्यांची संख्या १० ते १२ हजारांच्या आसपास आहे. मंत्रालय, उच्च न्यायालय, सरकारी- खासगी बँका, शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये ही मंडळी नोकरी करतात. पुण्यातून सकाळी निघणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस आदी गाडय़ांमधून प्रामुख्याने नोकरदार मंडळी आणि व्यावसायिक मुंबईत पोहोचतात. मुंबईतूनही पुण्यासाठी संध्याकाळी गाडय़ा धावतात. या दोन्ही गाडय़ांच्या माध्यमातून सकाळी कामावर हजर होऊन नोकरदार रात्री पुण्यात घरी पोहोचतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रवास सुरू होता. मात्र, रेल्वे बंद झाल्याने त्यात खंड पडला आहे.

पुण्यात राहून मुंबईत शासकीय, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रवासाचे साधन नसल्याने आणि इतर अडचणींमुळे त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने मुंबईप्रमाणे पुणे ते मुंबईदरम्यानही रेल्वेची सेवा सुरू करावी.

– हर्षां शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप अध्यक्षा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 12:25 am

Web Title: many jobs are in crisis due to railway closure abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 पणन मंडळाकडून राज्यात ४४ निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी
2 मागणी बेताचीच असूनही तूरडाळ शंभरीपार
3 धक्कादायक! पुण्यात एकाच दिवसात ८७७ रुग्ण आढळले; १९ रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X