परराज्यातील पालकांच्या फसवणुकीचे सत्र

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या आमिषाने परराज्यातील पालकांना चाळीस लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भामटय़ांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रामलक्ष्मी ई (वय ४०, रा. तामिळनाडू) यांनी यासंदर्भात विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पवन पांडे, हर्षवर्धन शैलेशकुमार सिंग, अभिनव वर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ड्रीम्स वे नॉलेज अँड सव्‍‌र्हिसेस नावाचे कार्यालय विमाननगर परिसरात सुरू केले होते. मे महिन्यात रामलक्ष्मी यांच्या मोबाईलवर भामटय़ांनी संपर्क साधला. तुमच्या मुलाला पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश हवा का? अशी विचारणा केली. त्यानंतर भामटय़ांनी त्यांच्याकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाईन व्यवहाराद्वारे पैसे घेतले. गेल्या चार महिन्यात भामटय़ांनी त्यांच्याकडून जवळपास चाळीस लाख रुपये उकळले. प्रवेशाबाबत विचारणा केल्यानंतर भामटय़ांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर राजलक्ष्मी यांनी पुण्यात येऊन पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक एस.एस.माने तपास करत आहेत.

आतापर्यंत एक कोटी रुपयांना गंडा

रामलक्ष्मी आखाती देशात नोकरी करत आहेत. गेल्या महिन्यात विमाननगर भागातील भामटय़ांनी हैद्राबादमधील चार पालकांना वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने साठ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलिसांनी भामटय़ांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. परराज्यातील पालकांशी संपर्क साधून त्यांना गंडा घालणारी टोळी सक्रिय आहे. पालकांनी अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन विमानतळ पोलिसांनी केले आहे.