औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील (आयटीआय) अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शून्य गुण मिळाल्याचे दिसत असल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी तांत्रिक अडचणीमुळे शून्य गुण दिसत असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्याव्या लावल्या गेल्या. आता दुसऱ्या परीक्षेतदेखील विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाल्याचे दिसत आहे.
यंत्रकारागीर घर्षक अभ्यासक्रमाच्या अनेक विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्राच्या परीक्षेत शून्य गुण मिळाले होते. तांत्रिक अडचणीमुळे शून्य गुण दिसत असल्याचे कारण त्यावेळी देण्यात आले.
विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, या कारणास्तव विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षार्थी म्हणून परीक्षेला बसण्यास सांगितले. त्यासाठी ६५० रुपयांचा भरूदड सोसून विद्यार्थी पुन्हा एकदा परीक्षेला बसले.
मात्र या परीक्षेतही साधारण ५० ते ६० विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाल्याचे दिसत आहे. काही विद्यार्थ्यांच्या तर तीनही सत्रांचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण शून्य असल्याचे दिसत आहे.
विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण महाविद्यालयांमार्फत थेट संकेतस्थळावर भरले जातात. गेल्या वेळेप्रमाणेच या वेळीही काही तांत्रिक अडचण आहे की, संस्था प्रशासनाची चूक आहे याबाबत राज्य व्यवसाय शिक्षण विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. याबाबत विभागाने सर्वच संस्थांकडून माहिती मागवली आहे.