मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या आंदोलनाला दोन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सकल मराठा समाजा’ने गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी खबरदारी म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व परमीट रूम, देशी-विदेशी दारु विक्री केंद्रे, ताडी विक्री दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही सर्व दुकानं बंद राहतील असे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम १९४९ अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, शहरातील शाळा आणि महाविद्यालयं आज बंद असतील हे कालच जाहीर करण्यात आलं आहे. तर, कोणतेही गालबोट न लावता, शांततेत बंद यशस्वी करुया, असे आवाहन मराठा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या –
> मराठा समाजाला आरक्षण द्यावे. या मुद्द्यावर सरकार गंभीर नसून चार वर्ष लोटूनही मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलेले नाही.
> ढासळत्या कृषी अर्थव्यवस्थेत होणारी घुसमट ओळखून त्यावर उपाययोजना कराव्यात.
> तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला असून यामुळे मराठा युवकांमध्ये असंतोष आहे. यावर तोडगा काढावा.
> शिक्षण, रोजगार निर्मितीसाठी शैक्षणिक फीमध्ये ५० टक्के सवलतीचा आदेश सरकारने काढला. पण महाविद्यालये हा आदेश मानत नसून यामुळे विद्यार्थ्यांची फरफट होत आहे. जिल्हास्तरावरील वसतीगृह उभारण्याच्या दिशेनेही पावले उचलण्यात आलेली नाही.
> अण्णासाहेब पाटील मागास आर्थिक विकास महामंडळाकडे अर्ज करुन वाट पाहणाऱ्या लाखो युवकांना व्यवसायासाठी बँकांकडून आर्थिक मदत मिळत नाही. मराठा युवक- युवतींना यापासून वंचित ठेवून सरकार काय साधू इच्छिते?.
> शेतकरी कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी यामुद्द्यांवर सरकार अपयशी ठरली आहे.
> महिलांवरील अत्याचार रोखण्यात सरकार उदासिन
> अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे.
> मराठा समाजाला आता आश्वासने नको असून सरकारने तातडीने मागण्यांबाबत ठोस निर्णय घ्यावा.
> मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या युवकांवरील गुन्हे मागे घ्यावे.
> राज्य मागासवर्गीय आयोगाचे कामकाज जलदगतीने पूर्ण करावे.
> मराठा आरक्षणासाठी २९ युवकांनी बलिदान दिले असून त्यांच्या कुटुंबियांना मदत आणि नोकरी द्यावी.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 9, 2018 8:46 am