राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दि. ९ ऑगस्ट रोजी (गुरूवार) विविध जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केले असल्याची माहिती मराठा क्रांती मूक मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

कोंढरे म्हणाले की, मराठा समाजाच्या मागणीसाठी दोन वर्षांपासून लढा देत आहोत. या मागणीसाठी अनेक तरुणांनी बलिदान देखील दिले असून त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात प्रगती अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. यावेळी मागास आयोगाचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत येणे अपेक्षित असल्याचे सरकारने न्यायालयाला सांगितले आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मराठा समाजाने धीर धरावा आंदोलन करु नये, असे आवाहन देखील न्यायालयाने केले आहे. या सर्व निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र याला गती प्राप्त व्हावी ही समाजाची अपेक्षा आहे. सर्व घडामोडी लक्षात घेता, येत्या ९ ऑगस्टचे नियोजित आंदोलन प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर केले जाणार आहे. कोणत्याही प्रकारचा कायदा हातामध्ये घेतला जाणार नाही. मराठा समाजातील कोणत्याही व्यक्तीने आत्महत्या करू नये, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.