कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा करावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी यासह विविध मागण्यांसाठी पुण्यातही मराठा समाजाने विक्रमी मोर्चा काढला. या मोर्चात गर्दीचे सर्व विक्रम मोडीत निघण्याची शक्यता असून या मोर्चात अजित पवार आणि अन्य राजकीय नेतेही सहभागी झाले आहेत.
गरवारे पुलाजवळील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुणे जिल्ह्याच्या मराठा क्रांती मूक मोर्चााला सुरुवात झाली. पुण्यातील रस्त्यांवर कोंडी झाल्याने मोर्चा काही काळ खंडुजीबाब चौकात थांबवण्यात आला. डेक्कनमधील ज्या परिसरातून मोर्चा सुरु झाला तिथे दुपारपर्यंत गर्दी दिसून येत होती. पुण्यातील मोर्चात अजित पवार, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले, शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, राज्यमंत्री विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, विश्वजीत कदम, भाई जगताप आदी नेतेमंडळीही या मोर्चात सहभागी झाले. पुण्यातील मोर्चातही महिला आणि तरुणींची उपस्थिती लक्षणीय होती. अन्य मोर्चांप्रमाणे हा मोर्चाही शिस्तबद्ध पार पडला. एक मराठा, लाख मराठाचे फलक, डोक्यावर पांढरी टोपी आणि भगवा झेंड्यांनी रस्ते व्यापून गेले होते.
मोर्चादरम्यान २० रुग्णवाहिका, ५५० डॉक्टर, २०० परिचारिका, ५०० परिचर्या कर्मचारी आणि २०० मदतनीस अशी चोख व्यवस्था करण्यात आली होती. मोर्चाच्या मार्गावर एक चौक सोडून एक अशा प्रकारे रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या. तसेच टोपी परिधान केलेले २०० माजी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी प्रत्येक चौकात उपस्थित राहून मदतनीस म्हणून काम करत होते. विशेष म्हणजे या मोर्चात मुस्लिम समाजाचा सहभाग लक्षणीय ठरला. रस्ते पॅक झाल्याने पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पुण्यापाठोपाठ यवतमाळमध्येही मराठा समाजाने मूक मोर्चा काढला होता. मोर्चाच्या शेवटी मराठा समाजातील मुलींनी जिल्हाधिका-यांना निवेदन दिले. राष्ट्रगीताने या मोर्चाचा समारोप करण्यात आला.