मराठा आरक्षणप्रश्नी शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण समन्वय समितीच्यावतीनं रविवारी पुण्यात जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हटवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच यापुढं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण जिथं जिथं जातील तिथं आंदोलन करणार असल्याचा इशारा मेटे यांनी दिला.

पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरजवळ झाशीची राणी चौकात हे जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. यावेळी मेटे म्हणाले, “मराठा आरक्षणावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असताना ते कोर्टात टिकावं याच्या खबरदारीकरीता मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे काहीही करत नाहीत, झोपलेल्या सरकारप्रमाणं ते वागतात. त्यांच्याकडे आरक्षण टिकवण्यासंदर्भात कुठलंही नियोजन नाही. वकिलांमध्ये कसलाही ताळमेळ नाही.”

“मराठा समाजाच्या हिताच्या गोष्टी कोर्टात मांडायला आम्ही सांगतो आहोत ते ही चव्हाण करत नाहीत. त्यामुळे ते उपसमितीचे निष्क्रिय अध्यक्ष म्हणून सिद्ध झाले आहेत. त्यांच्याऐवजी चांगला कर्तबगार मंत्री त्या ठिकाणी नेमावा. यासाठी अशोक चव्हाणांना हटवा आणि मराठा आरक्षण टिकवा अशी आम्ही मागणी केली आहे. चव्हाणांच्या ऐवजी एकनाथ शिंदे किंवा अजित पवार किंवा अन्य कोणा मंत्र्याकडे हा कारभार सोपवावा.” अशी मागणीही यावेळी मेटे यांनी केली.

“आघाडी सरकारमध्ये आजिबात समन्वय नाही. सुप्रीम कोर्टात मराठा समाजाबद्दल जी काळजी घ्यायची आहे ती घेण्याऐवजी फक्त आम्हाला खातं कसं मिळेल आणि खुर्च्या कशा शाबूत राहतील याच्याकडे मंत्र्यांचं लक्ष आहे. यापुढं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण जिथं जिथं जातील तिथं आम्ही आंदोलन करणार आहोत.”, असा इशाराही यावेळी विनायक मेटे यांनी केला.