मराठा समाजाला आरक्षणासाठी सकारात्मक असणाऱ्यांचे सरकार आले, तरच त्याचे लाभ मिळू शकतील. अन्यथा, आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे सरकार आल्यास याबाबतच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होणार नाही. परिणामी, आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहावे लागेल, असे सूचक विधान मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांनी पिंपरीत केले.
सेवा संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षनिमित्त पिंपरीत आयोजित एकदिवसीय अधिवेशनात ते बोलत होते. खेळाडू शिवानी इंगळे हिच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी विजयकुमार ठुबे, प्रकाश जाधव, विठ्ठल जाधव, अमृतराव सावंत, शांताराम कुंजीर आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, मराठा समाजात विचारांची व्याप्ती वाढली आहे. स्वत:ला बहुजन मानण्यास आता मराठा समाजाने मान्य केले आहे. मराठा आरक्षणाचा पुढील टप्पा म्हणजे केंद्र सरकारकडून एमपीएसएसी व यूपीएससीमध्ये समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे. या वेळी श्रीमंत कोकाटे यांचे ‘सेवा संघाची वाटचाल’ या विषयावर व्याख्यान झाले. २५ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेताना त्यांनी संघटनेवरील सर्व आक्षेप खोडून काढले. इतिहासाच्या पुनर्लेखनाचे महत्त्वपूर्ण काम संघाने केले, याकडे लक्ष वेधले. प्रास्ताविक प्रकाश जाधव यांनी, सूत्रसंचालन यशवंत गोसावी यांनी तर आभारप्रदर्शन व्यंकटेश सूर्यवंशी यांनी मानले.