गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा रद्द केल्यापासून याचे राज्यात पडसाद उमटताना दिसत आहे. विरोधी बाकांवरील भाजपाकडूनही कोंडी केली जात आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच मुद्द्यावरून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीवरून विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मेटे बोलत होते.

“मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र त्या बैठकीत नेमकं काय चर्चा झाली किंवा मराठा समजाला काय मिळालं. मुख्यमंत्र्यांनी अद्यापपर्यंत सांगितलं नाही. त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावं,” असा सवाल शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाबद्दल नेमकी काय चर्चा झाली?

मेटे म्हणाले की, “मराठा आरक्षणाचा निर्णय न्यायालयाने रद्द करून, जवळपास महिना होऊन गेला, तरी देखील सरकार न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करू शकलेले नाही. यामधून सरकारची मानसिकता दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही ५ जून रोजी बीड येथे भव्य मोर्चा काढला. या मोर्चात तरुण वर्गाचा राज्य सरकार विरोधात प्रचंड रोष पाहण्यास मिळाला. या सर्व घडामोडी घडत असताना. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारमधील अन्य मंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भेट घेतली. त्या बैठकीनंतर मराठा आरक्षणाबद्दल नेमकी काय चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले नाही. तेथून हात हलवत आले असून, त्यांच्या मनात पाप आहे,” असं म्हणत विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

हेही वाचा- “मी कधीही मोर्चा काढणार म्हणालो नाही”, आंदोलनाबाबतच्या संभ्रमावर संभाजीराजेंचं स्पष्टीकरण

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आता पुढील काळात राज्यातील अनेक ठिकाणी बैठका, मोर्चे आयोजित करून सरकारला जाब विचारणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात १५ तारखेला पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. त्याचबरोबर मुंबईत दुचाकी मोर्चा काढणार आहे,” अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.