स्वारगेट चौकातील राजर्षी शाहू पीएमपी बस स्थानक वाहनतळाजवळ असलेले वाहतुकीचे भले मोठे बेट (आयलंड) वाहतुकीसाठी अडथळा ठरत असून, ते तेथून हलवावे, अशी मागणी मराठा युवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी आयुक्तांकडे केली आहे. या बांधकामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
स्वारगेट चौकातील वाहतूक वळवण्यासाठी प्रशासनाने शाहू बस स्थानक वाहनतळाजवळ वर्तुळाकार बांधकाम करून झाडे लावली आहेत. परंतु या बांधकामामुळे वाहतुकीचा अधिकच खोळंबा होत आहे. वाहनचालक, अपंग व्यक्ती, रुग्णवाहिका आणि बस चालकांना गाडी चालवताना विशेष काळजी घ्यावी लागते. पादचाऱ्यांना चालताना कसरत करावी लागते. तसेच त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांसाठी हजारो लिटर पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे विनाकारण वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे बांधकाम काढून टाकण्यात यावे, अशी मागणी फाउंडेशनच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली आहे.