केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) सहावी ते बारावीच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये मराठय़ांच्या कार्याचा नाममात्र समावेश असून त्यांना न्याय मिळालेला नाही. १६ व्या ते १९ व्या शतकामध्ये महाराष्ट्राचा विविध सामाजिक, राजकीय पटलावरील भूमिका ही महत्त्वाची असूनही त्याकडे पुस्तकांमध्ये दुर्लक्ष झाले आहे, अशी टीका इतिहास तज्ज्ञांनी ‘केंद्रीय इतिहास अभ्यास समीक्षा परिषदे’मध्ये केली.
भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे केंद्रीय इतिहास अभ्यास समीक्षा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय शिक्षण संशोधन व अध्यापन मंडळाच्या (एनसीईआरटी) सहावी ते बारावीच्या पुस्तकांबाबत चर्चा क रण्यात आली. या परिषदेमध्ये डॉ. राजा दीक्षित, डॉ. सदानंद मोरे, निनाद बेडेकर, डॉ. भगवंतराव कुलकर्णी, डॉ. सदाशिव शिवदे, डॉ. सुमित्रा कुलकर्णी, पांडुरंग बलकवडे, डॉ. गणेश राऊत आदींनी विचार मांडले. अध्यक्षस्थानी डॉ. श्री. मा. भावे होते.
या वेळी डॉ. दीक्षित म्हणाले, ‘‘पुस्तकांमध्ये मराठय़ांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष झाले आहे. याचा काही दोष हा मराठी इतिहासकारांचाही असून मराठय़ांच्या इतिहासाचे लेखन हे इंग्लिश, हिंदी या भाषांमधून झाले असते, तर देशाच्या पातळीवर महाराष्ट्राच्या इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी बदलली असती.’’ महाराष्ट्रातील लोकांनीच मराठय़ांच्या इतिहासाचा संकोच केला आहे, असे मत डॉ. मोरे यांनी व्यक्त केले. ‘देशाच्या रक्षणासाठी मराठय़ांनी दिलेले योगदान मोठे आहे. परकीय आक्रमणापासून हिंदुस्थानचे रक्षण करण्याची जबाबदारी मराठय़ांनी पत्करली होती,’ असे मत बलकवडे यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. भावे यांनी सांगितले, ‘‘आपण आपल्या इतिहासाचा नव्या दृष्टीने आढावा घ्यावा, हिंदुस्थानच्या इतिहासातील मराठय़ांचे स्थान समजून घ्यावे यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमाविरुद्ध चळवळ उभी करण्याचा भारत इतिहास संशोधक मंडळाचा उद्देश नाही.’’