भाजी घेताना मोल करु नका असं आवाहन यावेळी नाना पाटेकर यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कलारंग सांस्कृतिक कला संस्थेतर्फे नाना पाटेकर यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यावेळी नाना पाटेकर यांनी अनेक प्रश्नावर दिलखुलास उत्तरं दिली. “कांद्याचा दर वाढला की बजेट कोलमडलं अशी आरडाओरड सुरु होते. तुमचे एखाद्या महिन्याचे बजेट कोलमडले तर काय फरक पडतो. त्या बळीराजाचं आयुष्याचं बजेट कोलमडलं आहे. त्याचाही कधीतरी विचार करा. मॉलमध्ये मुकाटपणे पैसे मोजता आणि शेतकऱ्याच्या भाजीचे मात्र दर पाडून मागता. भाजीचे मोल करु नका,” असं नाना पाटेकर यांनी म्हटलं.

शेतकरी भिकारी नाहीत
नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांना भावनिक पाठिंबा आणि प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं नाना पाटेकर यांनी यावेळी सांगितलं. “राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांना पैसे नाही दिले तरी चालतील. त्यांना फक्त कर्जमाफी नाही तर भावनिक पाठिंबा आणि प्रोत्साहनाची गरज असते. आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, शेतकरी काही भिकारी नाहीत,” असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.

मला राजकारणात येण्याची ऑफर होती
“मला राजकारणात येण्याची ऑफर होती. पण राजकारण माझा पिंड नाही. तिथं गेलो तर कोणकोणत्या पक्षात जायचं. एका वेळेनंतर पुढे पक्षच उरणार नाहीत. शेवटी मी एकटाच राहायचो,” असं नाना पाटेकर यांनी म्हटलं. नाना पाटेकर यांनी यावेळी बोलताना सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत असं मत व्यक्त केलं. “राजकारण्यांना प्रश्न विचारायला पाहिजेत. आपण मत देतो, मग प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. पाच वर्षांनी एकदा मत मिळतं. मग, त्याचे धिंडवडे का काढता? का त्याची गाढवावर बसून धिंड काढता? सामान्य नागरिक गप्प बसतो. याचा मला खूप त्रास होतो,” असं यावेळी नाना पाटेकर यांनी सांगितलं. नाना पाटेकर यांनी यावेळी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना टोलाही लगावला.