पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात ‘मी सावरकर’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात विजेत्यांची भाषणे आणि पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हस्ते होणार असून शरद पोंक्षे यांचं व्याख्यानही ठेवण्यात आलं आहे. मात्र कार्यक्रमापूर्वी पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शवत आंदोलन करण्यास सुरुवात केली. यावेळी विद्यार्थ्यांनी गांधीजींचा खून करणाऱ्या गोडसेचं समर्थन करणाऱ्या पोक्षेंचा जाहीर निषेध असे पोस्टर झळकावले. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात कार्यक्रम सुरु करण्यात आला.
कार्यक्रम सुरु होण्यापुर्वी महाविद्यालय परिसरात पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे कार्यक्रम होणार की नाही अशी चर्चा सुरू झाली. पण शरद पोंक्षे यांनी कार्यक्रम ठिकाणी हजेरी लावली आणि अखेर कार्यक्रम सुरू झाला. कोणताही चुकीचा प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र यादरम्यान पुरोगामी विद्यार्थी संघटनेकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्याला प्रत्युत्तर देत उपस्थित स्वयंसेवकांनी देखील घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यामुळे काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता.
कार्यक्रमाचे आयोजक रणजित नातू म्हणाले की, “मी सावरकर या कार्यक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष असून या ठिकाणी यापुर्वी अनेक वक्ते आले आहेत. यंदाच्या वर्षी शरद पोंक्षे यांना निमंत्रित करण्यात आले असून ते त्यांचे विचार या ठिकाणी मांडणार आहेl. मात्र या कार्यक्रमापुर्वी काही संघटनांकडून सावरकर यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हे आम्ही खपवून घेतले जाणार नसल्याचे त्यांना सांगितलं आहे”.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 29, 2020 6:42 pm